पुणे : दुचाकीस्वार चोरट्यांकडून नागरिकांना अडवून लुटमार

पुणे, 15 जून 2021 :- दुचाकीस्वार चोरट्यांकडून शहरातील विविध भागात नागरिकांना लक्ष्य करून लुटमार केली जात असल्याचे दिसून आले आहे. कोयत्यासह विविध शस्त्रांचा धाक दाखवून मारहाण करून लुटले जाते आहे. दोन दिवसात जबरी चोरीच्या तीन घटना घडल्या असून, याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रस्त्याने पायी चाललेल्या तरूणाला अडवून चोरट्यांनी 16 हजारांचा मोबाईल हिसकावून नेला. ही घटना रविवारी(दि.13) पहाटे सव्वा चारच्या सुमारास मालधक्का परिसरात घडली. याप्रकरणी अमोल भाऊराव शिरतुरे (वय 38,रा पुणे विद्यापीठ) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक काळे करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी दुचाकीस्वाराला अडवून शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील 2 हजारांची रोकड चोरून नेली. ही घटना सोमवारी(दि.14) संध्याकाळी सातच्या सुमारास कात्रज-कोंढवा रस्त्यावर घडली. संजय दशरथ शेडगे (वय 51,रा. शेलारमळा, गुजरवस्ती, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. चोरट्यांनी परिसरात जमलेल्या नागरिक व दुकानदारांना कोयत्याच्या धाकाने दमदाटी करून दहशत निर्माण केली. भितीपोटी दुकादारांनी दुकाने बंद केली.

तिसऱ्या घटनेत चोरट्यांनी तरुणाच्या डोळ्यात मिरचीपावडर टाकून 35 हजार रुपये किंमतीची दुचाकी जबरदस्तीने हिसकावून नेली. ही घटना रविवारी (दि.13) रात्री दहाच्या सुमारास कामठे मळा फुरसूंगी परिसरात घडली. याप्रकरणी अक्षय दत्तात्रय शिर्के (वय 25,रा. फुरसूगी) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अक्षय दुचाकीवरून घरी निघाला होता. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी अक्षयच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली. डोळ्यांची आग झाल्यामुळे तो दुचाकीवरून खाली पडला. त्यानंतर चोरट्यांनी त्याला कोयत्याचा धाक दाखवू दुचाकी चोरून नेली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गायकवाड करीत आहेत.