लोणावळ्यात दोन वर्षांच्या बालकाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू, जुळ्या मुलांच्या वाढदिवशी दुर्देवी घटना

लोणावळा, १९/०७/२०२२: लोणावळ्यात दोन वर्षांच्या जुळ्या बालकांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. दोन वर्षांच्या जुळ्या मुलांपैकी एकाचा बंगल्यातील जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली.

 

शिवबा अखिल पवार (वय २) असे जलतरण तलावात बुडून मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. अखिल पवार शिरुर तालुक्यातील शिक्रापूर परिसरात राहायला आहे. पवार मूळचे नगर जिल्ह्यातील पाथर्डीमधील आहेत. पवार यांना जुळे मुले आहेत. मुलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पवार यांनी तुंगार्लीतील गोल्ड व्हॅलीतील पुष्पा व्हिला बंगला भाडेतत्वावर घेतला हाेता.

 

पवार कुटुंबीय बंगल्यात वाढदिवस साजरा करण्यासाठी आले. पवार कुटुंबीयांनी बंगल्यात तयारी सुरु केली. त्या वेळी शिवबा बंगल्यात खेळत होता. तो रांगत जलतरण तलावाजवळ गेला आणि काही कळायच्या आत तो जलतरण तलावात बुडाला. दरम्यान, शिवबा बंगल्यात आढळून न आल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. काही वेळानंतर जलतरण तलावातील पाण्यात शिवबा आढळून आला. त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी लोणावळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.