December 23, 2025

उद्धव ठाकरे काठाला पुण्यात मोठे खिंडार सुतार भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे, २३ डिसेंबर २०२५: पुणे महापालिकेचे पडघम वाजण्यास सुरुवात झालेली असताना भाजपने आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जोरदार दणका दिला या पक्षाचे दोन ज्येष्ठ माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार आणि संजय भोसले या दोघांना पक्षात प्रवेश दिला. भाजपने अचानकपणे ही खेळी खेळल्याने महाविकास आघाडीतील जागेचे गणित देखील बिघडून गेलेले आहे. तर दुसरीकडे कोथरूड मधील भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचाही पत्ता कट होणार असल्याने ते चिंताग्रस्त झालेली आहेत.

भाजपने महापालिका निवडणुकीमध्ये १२५ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. ज्या जागा जिंकता येत नाहीत तेथील अन्य पक्षातील माजी नगरसेवक किंवा तुल्यबळ उमेदवार भाजपमध्ये घेऊन ती जागा जिंकण्याचा खटाटोप सुरू झालेला आहे. चार दिवसापूर्वी भाजपने मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस मधील माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेतला होता. त्यानंतर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक गळाला लावलेले आहेत.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये पृथ्वीराज सुतार आणि संजय भोसले या दोघांचे प्रवेश झाले यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर आदी उपस्थित होते.
पृथ्वीराज सुतार हे प्रभाग क्रमांक 31 मयूर कॉलनी कोथरूड गावठाण या प्रभागातले उमेदवार असणार आहेत. मात्र आता सुतार यांच्या या प्रवेशामुळे दुष्यंत मोहोळ, नवनाथ जाधव दोघांच्याही इच्छेवर पाणी फिरले जाणार आहे. तर संजय भोसले हे येरवडा गांधीनगर प्रभाग क्रमांक सहा मधून भाजपचे उमेदवार असतील. या प्रभागात भाजपची स्थिती अतिशय नाजूक असल्याने संजय भोसले यांचा फायदा भाजपला होणार आहे.

संजय भोसले म्हणाले, “आम्ही महाविकास आघाडीमध्ये
काँग्रेसच्या सोबत हात हात घालून प्रचार केला पण आता ते शक्य नाही./आम्हाला त्यांच्याकडे प्रभाग सोडा अशी भिक मागवी लागत आहे. त्यामुळे आमच्या मन दुखणार ही घटना आहे. आम्ही युतीमध्ये भाजपसोबत २५ वर्ष काम केले. काँग्रेस महाविकास आघाडीचा धर्म पाळत नाही त्यामुळे आमच्यावर ही वेळ आली आहे.`

मुरलीधर मोहोळ म्हणाले, अनेक वर्ष तुम्ही एका परिवारामध्ये राहून काम केले होते. ते आता आमच्याकडे आलेले असल्याने आम्ही तुम्हाला कोणतेही वेगळी वागणूक देणार नाही. तुम्ही आमच्यापैकीच आहात. उलट तुम्ही सख्या भावाकडे आलो आहोत असे तुम्हाला वाटेल. सन्मानाची वागणूक मिळेल. सुतार आणि भोसले यांना प्रवेश दिलेला असला तरी हा संघटनेचा निर्णय आहे त्यांना उमेदवारी द्यायची की नाही हा निर्णय पक्ष देईल.