पुणे, १६ एप्रिल २०२५ ः मोटार वाहन कायद्यानुसार टॅक्सी आणि रिक्षा चालकांना गणवेश परिधान करणे बंधनकारक असताना देखील अनेकदा या कायद्याचे उल्लंघन होतानाचे पाहायला मिळाले आहे. अनेकदा रिक्षा व टॅक्सी चालकांद्वारे गणवेश परिधान न करताच वाहने चालविण्याचे प्रकार आढळून आले आहेत. याचीच दखल घेत आता प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे (आरटीओ) रिक्षा व टॅक्सी चालकांच्या गणवेश आणि इतर आवश्यक कागदपत्रांची तपासणीची मोहीम राबविण्यात येणार आहे.
याबाबतची माहिती आरटीओचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी परिपत्रकाद्वारे जाहीर केली आहे. रिक्षा व टॅक्सी चालकांनी पांढरा शर्ट (बुश शर्ट) व खाकी रंगाची पँट असा गणवेश परिधान करणे अनिवार्य आहे. तसेच त्यांना सोबत ओळखपत्र बाळगणे देखील बंधनकारक आहे. मात्र अनेकदा रिक्षा व टॅक्सी चालक किंवा परवानाधारक हे वाहन चालवत असताना या नियमाचा पालन करत नसल्याचे दिसून येते.
त्यामुळे आरटीओद्वारे आता तपासणी केली जाणार असून यामध्ये चालकांनी परिधान केलेले गणवेश, ओळखपत्र, मीटर तपासणी, वाहनांची वैध कागदपत्रे आदी गोष्टी तपासल्या जाणार आहेत.
दरम्यान या तपास मोहीमेत कारवाई टाळण्यासाठी चालकांनी आवश्यक ती कागदपत्रे सोबत ठेवावीत, असे आवाहन देखील भोसले यांनी केले आहे.
कायदा काय सांगतो…
महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ चे नियम २१ चे पोटनियम १८ मध्ये टॅक्सी व रिक्षा चालकांचे गणवेश परिधानाच्या नियमाबाबत खालीलप्रमाणे उल्लेख आहे.
– मोटार कॅबचा चालक किंवा परमिट धारक जेव्हा स्वतः मोटार कॅब चालवतो तेव्हा त्याने पांढरा शर्ट किंवा बुश शर्ट आणि खाकी पँट घालावी.
– मोटार कॅबचा चालक किंवा परमिट धारक जेव्हा स्वतः मोटार कॅब चालवतो तेव्हा त्याने या नियमांच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे लॅमिनेटेड ओळखपत्र छातीच्या उजव्या बाजूला प्रदर्शित करावे, जे परवाना प्राधिकरणाने पन्नास रुपये भरून दिले आहे.
– दरम्यान आपत्कालीन परिस्थितीत कर्तव्ये पार पाडण्यासाठी किंवा प्रशिक्षण घेताना या नियमात सरकारद्वारे वाहन चालकांना सूट देण्यात आली आहे.
More Stories
Pune: मेधा ताई तुमच्या बापाचा शनिवारवाडा नाही – रुपाली ठोंबरे पाटील
Pune: जैन बोर्डिंग जागा विक्रीव्यवहार प्रकरणाला जैसे थे ठेवण्याचे आदेश
Pune: पहिला ‘खासदार क्रीडा महोत्सव’ रंगणार २ ते १६ नोव्हेंबरदरम्यान