September 21, 2025

पुणे मेट्रो फेज-२ ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; दोन नवीन कॉरिडॉरमुळे पूर्व–पश्चिम जोड मजबूत

नवी दिल्ली/पुणे, २५ जून २०२५ : पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला (Phase-2) आज मंजुरी दिली. या टप्प्यात दोन नवीन मेट्रो मार्गांचा समावेश असून ते शहराच्या पूर्व–पश्चिम दिशांतील दळणवळण अधिक सुलभ करणार आहेत.

नवीन मंजूर मार्ग-
कॉरिडॉर २अ: वनाज ते चांदणी चौक
कॉरिडॉर २ब: रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी

हे दोन्ही उन्नत मार्ग एकत्रितपणे १२.७५ किलोमीटर अंतर व्यापतील आणि यामध्ये १३ नवीन स्थानकांचा समावेश असेल. हे विस्तार वनाज–रामवाडी मेट्रो मार्गाचा भाग असून, फेज-१ अंतर्गत आधीच विकसित झालेल्या मार्गात हे जोडले जातील. नव्या मार्गांमुळे बाणेर, बावधन, कोथरूड, खराडी, वाघोली यांसारख्या जलद विकसित होणाऱ्या उपनगरांना चांगली सेवा मिळणार आहे.

या प्रकल्पासाठी एकूण खर्च ₹३,६२६.२४ कोटी इतका अपेक्षित असून, तो केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन आणि आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांद्वारे सामायिक केला जाणार आहे. चार वर्षांत बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित असून, प्रत्यक्ष अंमलबजावणीचा भार महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) यांच्याकडे राहील. प्रकल्पाचे पूर्वतयारीचे काम – जसे की सर्व्हेक्षण व आराखडा तयार करणे – सध्या सुरू आहे.

नवीन कॉरिडॉर मेट्रोच्या लाइन-१ (निगडी–कात्रज) आणि लाइन-३ (हिंजवडी–डिस्ट्रिक्ट कोर्ट) शी जोडले जाणार असून, डिस्ट्रिक्ट कोर्ट स्टेशन येथे इंटरचेंज सुविधा उपलब्ध राहील. यामुळे प्रवाशांना संपूर्ण मेट्रो नेटवर्कवर सहज व सुलभ प्रवास करता येणार आहे.

तसेच, हा विस्तार चांदणी चौक आणि वाघोली मार्गे पुण्याच्या प्रमुख आंतरशहर बस टर्मिनल्सना – जसे की मुंबई, बेंगळुरू, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर – जोडणार आहे. त्यामुळे एकात्मिक वाहतूक साधने विकसित होणार आहेत.

२०२७ पर्यंत दररोज सुमारे ९६,००० प्रवासी आणि २०५७ पर्यंत ३.४९ लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे पौड रोड, नगर रोडसारख्या वाहतूकदाट रस्त्यांवरील ताण कमी होणार असून, नागरीकांना पर्यावरणपूरक, सुरक्षित व वेगवान वाहतुकीचा पर्याय मिळणार आहे.
दरम्यान हा मेट्रो विस्तार पुण्याच्या शाश्वत विकासाला चालना देणारा असून, शहराच्या आर्थिक आणि प्रादेशिक प्रगतीसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.