पुणे विद्यापीठ: परीक्षा अर्ज भरण्यासाठी शेवटची मुदत

पुणे, २०/०६/२०२१: द्वितीय सत्र परीक्षेचे अर्ज भरताना अडचणी येत असल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विलंब शुल्क न आकारता २७ जून पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

पुणे विद्यापीठाने जुलै-आॅगस्ट महिन्यात द्वितीय सत्र परीक्षेचे नियोजन केले आहे. विद्यार्थ्यांचा शुल्काचा मुद्‍दा वादात सापडल्याने अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विद्यापीठाकडे पाठवलेले नाहीत. तसेच अर्ज भरताना तांत्रिक अडचणी येत असल्याने अर्ज भरण्यास मुदतवाढ द्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती.

परीक्षा विभागाने याची दखल घेतली असून, ही मुदत १८ जून रोजी संपलेली होती. पण विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून परीक्षा अर्ज भरण्यासाठी २७ जून पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचे विलंब शुल्क आकारले जाणार नसल्याचे परीक्षा विभागाने स्पष्ट केले आहे.