अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या घरी घुसण्याचा अज्ञाताचा प्रयत्न; वडिलांवर केला हल्ला

पुणे, २५ मे २०२१: मराठी सिने-अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या घरी अज्ञाताने घुसखोरी केल्याची घटना समोर आली आहे. सोनाली कुलकर्णी यांच्या घरी वडिलांवर अज्ञाताने हल्ला केला असून, या प्रकरणी निगडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामध्ये ते जखमी झाले आहेत. ही घटना आज मंगळवारी (दि. २५) सकाळी सातच्या सुमारास निगडी येथे घडली. अजय शेगटे असे ताब्यात घेतलेल्या अज्ञाताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली यांचे निगडी, प्राधिकरण येथील सेक्टर क्रमांक २५ येथे घर आहे.

आरोपी अजय हा सकाळी अचानक सोनाली यांच्या घरात घुसला. त्यावेळी सोनाली यांचे आई-वडील घरात होते. सोनाली यांच्या वडिलांनी अजयला घरात घुसताना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र,अजयने त्यांच्यावर चाकूने वार केला. यामध्ये ते किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्या हाताला दुखापत झाली. याबाबत परिसरातील नागरिकांना माहिती मिळताच त्यांनी अजयला पकडले. त्यावेळी त्यांच्यातही झटापट झाली. नागरिकांनी पोलिसांना कळविताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी अजयला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी निगडी पोलीस तपास करीत आहेत.