‘पुणे मेट्रो लाईन ३’ च्या संकेतस्थळाचे अनावरण

पुणे, दिनांक २४ नोव्हेंबर २०२२: हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गिकेवरील पुणे मेट्रो लाईन ३ अर्थात पुणेरी मेट्रोचे काम वेगाने प्रगतीपथावर आहे. टाटा समूहाची स्पेशल पर्पज व्हेईकल कंपनी असलेल्या पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (पीआयसीटीएमआरएल) आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे २३ किलोमीटर लांबीच्या मार्गावर सुरु असलेल्या या प्रकल्पाच्या उभारणीसाठी ठिकठिकाणी काम जोमाने सुरू असलेले पहावयास मिळत आहे.

‘पुणेरी मेट्रो’ असे नामकरण झालेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन ३ ची सर्वंकष माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देणारे संकेतस्थळ (वेबसाईट) विकसित करण्यात आले असून त्याचे अनावरण आज ‘पीआयटीसीएमआरएल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर यांच्या हस्ते करण्यात आले. ‘पीआयटीसीएमआरएल’च्या बिझनेस हेड व संचालिका नेहा पंडित, ‘पीएमआरडीए’चे मुख्य अभियंता विवेक खरवडकर, अधीक्षक अभियंता रिनाज पठाण, भारतकुमार बाविस्कर आणि अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

“हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन ३ साठीचे संकेतस्थळ बनविताना ते वापरासाठी सुलभ (युजर फ्रेंडली) असेल, वापरकर्त्यांना आकर्षित करून घेणारे व त्याचवेळी आवश्यक असलेली सर्व माहिती एकत्रित स्वरूपात उपलब्ध करून देणारे असेल याची दक्षता घेण्यात आलेली आहे,” असे पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडच्या बिझनेस हेड व संचालिका नेहा पंडित यांनी सांगितले.

“हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो लाईनला ‘पिंक लाईन’ म्हणून ओळखले जाणार असल्याने, वेबसाईटच्या रंगसंगतीमध्ये त्याचा खास विचार करण्यात आलेला आहे. तूर्तास या मार्गिकेची मूलभूत माहिती देणे, कम्युनिटी कनेक्ट आणि ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी होत असलेले प्रयत्न आणि नियोजन नागरिकांपर्यंत पोचविणे ही वेबसाईटचा उद्देश आहे. जसजसे प्रकल्पाचे काम पुढे सरकेल, त्यानुसार वेबसाईटचे आरेखन आणि मजकूर अद्ययावत केला जाईल,” असेही नेहा पंडित पुढे म्हणाल्या.

या संकेतस्थळाचे औपचारीक अनावरण आज झाले असून काही तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर पुढील महिन्याभरात हे संकेतस्थळ सर्व नागरिकांसाठी खुले करून देण्याचे नियोजन आहे.

पुणे मेट्रो लाईन ३ बाबत माहिती:

पुणे मेट्रो लाईन ३ हा हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणारा २३ किमीचा उन्नत मेट्रो रेल्वे प्रकल्प आहे. हा सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) प्रकल्प आहे, जो पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) द्वारे टाटा समूहाच्या ट्रिल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (TUTPL) आणि सिमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स (Siemens Project Ventures GmbH) यांचा समावेश असलेल्या कन्सोर्टियमला प्रदान करण्यात आला आहे. हा प्रकल्प डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर (DBFOT) तत्त्वावर पुणे आयटीसिटी मेट्रो रेल लिमिटेड या विशेष उद्देश कंपनी द्वारे ३५ वर्षांच्या सवलतीच्या कालावधीसाठी विकसित आणि ऑपरेट केला जाणार आहे.