पुण्यातील लसीकरण मोहिम रविवारी बंद

पुणे, ता. ५/०६/२०२१: महापालिकेकडील कोव्हॅक्सीन व कोव्हीशील्ड लसीचे डोस संपल्याने रविवारी (ता. ६) लसीकरण होणार नसल्याचे महापालिका प्रशासनाने कळविले आहे.

महापालिकेला कोव्हीशील्डचे २४ हजार डोस मिळाले होते, त्यानुसार तीन दिवस शहरात लसीकरण करण्यात आले. तर कोव्हॅक्सीनचे सुमारे साडे तीन हजार डोस उपलब्ध होते. या दोन्ही लसी संपल्याने व शासनाकडून नव्याने लस पुरवठा झालेला नसल्याने रविवारी लसीकरण होणार नाही. लस उपलब्ध झाल्यास सोमवारचे नियोजन केले जाईल, असे महापालिका प्रशासनाने कळविले आहे.

शहरात २५ हजार जणांचे लसीकरण
आज (शनिवारी) महापालिकेतर्फे ७७ ठिकाणी लसीकरण झाले, तर खासगी रुग्णालयातर्फे कामाच्या ठिकाणी जाऊन लसीकरण केले गेले, त्यात २४ हजार ९९ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये १९ हजार ७०५ १८ ते ४४ वयोटातील तरुणांचे लसीकरण झाले आहे. तर २६३ आरोग्य कर्मचारी ४७२ फ्रंटलाइन कर्मचारी यांचे लसीकरण झाले. १ हजार ४९६ ज्येष्ठ नागरिक, ३ हजार १३७ ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण झाले. शहरात आत्तापर्यंत एकूण ११ लाख ७७ हजार ९५४ जणांचे लसीकरण झाले आहे.