परदेशी विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरुवात

पुणे,दि.८- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला आजपासून (८ जुलै) सुरुवात करण्यात आली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आतंरराष्ट्रीय केंद्र, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने व ‘वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ स्टुडंट अँड युथ’ यांच्या सहकार्याने हा लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात ऑनलाईन नोंदणी केलेल्या २०० हून अधिक विद्यार्थ्यांचे लसीकरण आजपासून सुरू करण्यात आले.

या लसीकरण कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ., प्रफुल्ल पवार, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, प्रसेनजीत फडणवीस, अधिसभा सदस्य बागेश्री मंठाळकर, आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या विभागीय संचालक अनुजा चक्रवर्ती आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली.

यावेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले, विद्यापीठाच्या मदतीने येत्या काळात सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल.

डॉ. विजय खरे म्हणाले, या लसीकरण कार्यक्रमामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सांस्कृतिक संबंध प्रस्थापित होत असून हे विद्यार्थी भारताचे राजदूत म्हणून प्रतिनिधित्व करतील.

कोट
देशात पहिल्यांदाच अशाप्रकारे परदेशी विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जात आहे. परदेशी विद्यार्थ्यांबरोबरच राष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याचा आमचा मानस आहे.
– प्रा. डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ