विश्रांतवाडी ते विमानतळ रस्ता होणार सिमेंट काँक्रीटचा – आमदार सुनिल टिंगरे यांची माहिती

पुणे, ०४/११/२०२२: विश्रांतवाडीकडून विमानतळाकडे जाणारा संपूर्ण रस्ता आता सिमेंट कॉक्रीटचा होणार आहे. या रस्त्यासह वडगाव शेरी मतदारसंघातील रस्त्याच्या 42 कोटींच्या कामांना महापालिकेच्या सिमेंट एस्टिमेट कमिटीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याची माहिती वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी दिली.

पावसाळ्यात विश्रांतवाडीकडून ५०९ चौक मार्गे विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करून हा संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रेटचा करण्यात यावा अशी मागणी आमदार सुनील टिंगरे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली होती.  तसेच वडगाव शेरी मतदारसंघातील पावसामुळे खड्डे पडलेल्या रस्त्यांचीही तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन आयुक्तांनी वडगाव शेरी मतदारसंघातील प्रमुख रस्त्यांच्या कामासाठी 42 कोटींच्या आराखड्यास नुकतीच इस्टिमेट कमिटीच्या बैठकीत मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार टिंगरे यांनी दिली.  त्यात प्रामुख्याने विश्रांतवाडी टिंगरेनगर मार्गे विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याचे महत्त्व लक्षात घेऊन हा संपूर्ण रस्ता आता सिमेंट काँक्रेटचा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.  या रस्त्याच्या कामासाठी 19 कोटींचा खर्च येणार असल्याची माहिती आमदार टिंगरे यांनी दिली.

वडगाव शेरीतील रस्ते आणि मंजूर निधी

– विश्रांतवाडी – 509 चौक- विमानतळ  – 19 कोटी
– पुणे नगर रोड रिसर्फेसिंग –  15 कोटी
– बिशप स्कूल ते ब्रह्मा सनसिटी वडगाव शेरी 7 कोटी 25 लाख.
– 509 चौक ते नागपूर चाळ –  1 कोटी