विवो प्रो कबड्डी स्पर्धा पुण्याकडून पराभवाची परतफेड, बंगळुरू संघावर निसटता विजय

हैदराबाद, 20 नोव्हेंबर 2022- सोळा गुणांनी पिछाडीवर असलेल्या बंगळुरू बुल्स संघाने पुणेरी पलटणला शेवटच्या चढाईपर्यंत झुंजविले. तथापि हा सामना ३५-३३ असा जिंकून पुणे संघाने विवो प्रो कबड्डी स्पर्धेत रोमहर्षक विजय मिळविला.

मध्यंतराला पुणे संघ दहा गुणांनी आघाडीवर होता.

गचीबावली इनडोअर स्टेडियमवर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याआधी झालेल्या १५ लढतींमध्ये पुणे संघाने नऊ लढती जिंकल्या आहेत तर बंगलोर संघाने तेवढ्याच लढतींमध्ये दहा सामने जिंकले होते. या आधी दोन संघांमध्ये झालेला सामना बंगळुरू संघाने केवळ दोन गुणांनी जिंकला होता. त्यामुळे या दोन्ही संघांमधील आजची लढतीही रंगतदार होईल अशी अपेक्षा होती.

सामन्याच्या नवव्या मिनिटाला पुणे संघाने पहिला लोण चढविला. त्यावेळी त्यांच्याकडे १२-४ अशी आघाडी होती.‌ एक वेळ त्यांनी १४ गुणांपर्यंत वाढवली होती. मध्यंतराला पुणे संघाने २०-१० अशी आघाडी घेतली होती.

उत्तरार्धात चौथ्याच मिनिटाला पुणे संघाने दुसरा लोण चढवीत आपली बाजू बळकट केली. सामन्याच्या २७ व्या मिनिटाला पुणे संघाने १६ गुणांची आघाडी घेतली होती. शेवटची पाच मिनिटे बाकी असताना पुण्याकडे ३२-२० अशी आघाडी होती. मात्र पुढच्याच मिनिटाला त्यांच्यावर लोण चढवीत बंगळुरू संघाने सामन्यातील रंगत वाढविली. त्यावेळी पुणे संघाकडे जेमतेम पाच गुणांची आघाडी राहिली होती.

पुणे संघाकडून मोहित गोयत व आकाश शिंदे यांनी जोरदार चढाया करीत अधिकाधिक गुण मिळविले. बंगळुरु संघाकडून नीरज नरवाल व भरतकुमार यांची झुंज कौतुकास्पद होती.