पुणे महापालिकेची प्रभाग रचना आज जाहीर होणार

पुणे, ०१/०२/२०२२: महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर करण्याची महापालिकेची तयारी पूर्ण झाली आहे. आज (ता. १) सकाळी ११ नंतर महापालिकेच्या संकेतस्थळासह, महापालिका भवन व सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रभागाची माहिती व नकाशे नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत, अशी माहिती उपायुक्त अजित देशमुख यांनी दिली.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया राबविण्यास सुरवात झाली आहे. २८ जानेवारी रोजी आयोगाने महापालिकेने तयार केलेला आराखडा मंजूर केल्यानंतर आता तो नागरिकांना हरकती सूचना नोंदविण्यासाठी खुला केला जाणार आहे. त्यामध्ये प्रभागाची चतुःसिमेसह प्रभाग निहाय व एकत्रित असे नकाशेही जाहीर केले जाणार आहेत.

पुणे महापालिका भवनाच्या विस्तारित इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर प्रारूप प्रभाग रचना पाहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच क्षेत्रीय कार्यालय निहाय संबंधित प्रभागांचे स्वतंत्र नकाश नागरिकांसाठी उपलब्ध असतील. महापालिकेच्या संकेतस्थळावरही ही माहिती असणार आहे.

महत्त्वाचे टप्पे आणि तारीख
– प्रभागांच्या सीमा दर्शविणारी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करणे – १ फेब्रुवारी
– अधिसूचनेवर हरकती व सूचनांसाठी मुदत – १ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी
– हरकती व सूचनांचे विवरणपत्र आयोगाला सादर करणे – १६ फेब्रुवारी
– हरकती व सूचनांवर सुनावणीसाठी अंतिम मुदत – २६ फेब्रुवारी
– सुनावणीनंतर शिफारशींसह विवरणपत्र आयोगाला पाठविणे – २ मार्च