पुण्यातील कचरावेचकांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा

पुणे , ३/८/२०२१: नेहमीचा ५ वर्षांचा करार करण्याचे सोडून, दोन महिने किंवा एक वर्षाचा करार करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याचे समजते. मी दिल्यासारखे करतो तू घेतल्यासारखे कर अशी सारवासारव होत आहे का? निवडणूक काळात दारोदार कचरा संकलनाचा प्रश्न पेटू नये म्हणून हा घाट रचला जात असल्याचे मनपा वर्तुळात बोलले जात आहे.

गेल्या काही वर्षांपासून पुणे महानगरपालिकेने सतत कचरावेचकांकडे दुर्लक्ष केले आहे. गोड बोलायचे, आश्वासने द्यायची आणि प्रत्यक्षात काहीच करायचे नाही असेच होत आले आहे. शहरातील सर्वात वंचित कष्टकऱ्यांना गृहीत धरले जात आहे. आमच्या सोबत खुली चर्चा करा. आमचे म्हणणे ऐकून घ्या. आमच्या रास्त मागण्या मान्य करा. असे म्हणत कचरावेचकांनी दिनांक १० ऑगस्ट २०२१ पासून शहरव्यापी आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

“पुणे महानगरपालिकेने दारोदार जाऊन मेहनतीने शहर स्वच्छ ठेवणाऱ्या कष्टकऱ्यांकडे वारंवार दुर्लक्ष करणे हे खरोखरीच लज्जास्पद आहे. कष्टकऱ्यांकडे पाठ फिरविणे हा पुणे महानगरपालिकेचा इतिहास नाही. माझ्या कचरा वेचक बंधू-भगिनींच्या मागण्या मान्य होईपर्यंत मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनात सहभागी होणार आहे”. – डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ कामगार नेते