पुणे, 07/10/2025: खडकी स्टेशन येथे आता रेल्वेचे जंक्शन केले जात आहे. या जंक्शनचे प्रवेशद्वार औंधरोड कडील भागांत केलं जात आहे. हा रस्ता नेहमी व्यस्त असतो. त्यामुळे या रस्त्यालगत जंक्शनचे प्रवेशद्वार केले तर पुन्हा या ठिकाणी वाहनांची गर्दी होऊन पुन्हा वाहतूक समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे स्थानिकांना विश्वासात घेऊन यावर तोडगा काढावा अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तसेच प्रवक्ते सुनील माने यांनी दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी रेल्वे प्रशासनाला दिले आहे.
त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पुणे स्टेशन रेल्वे जंक्शनवरील होणारी गर्दी आणि ताण कमी करण्यासाठी खडकी आणि हडपसर स्टेशनचा विकास केला जात आहे. खडकी स्टेशनचा विस्तार करून येत्या काही दिवसांत आपण खडकी स्टेशनवरुन गाड्या सोडणार आहात. मात्र खडकी स्टेशनचा विस्तार करतांना आपण औंध रोडवरील सेंट थॉमस चर्च चौकाजवळ प्रवेशद्वार बांधले आहे. हे चिंताजनक आहे. हा रस्ता नेहमी वर्दळीचा असतो. तसेच जंक्शनवर सुद्धा गर्दी वाढत आहे. सकाळी आणि सायंकाळी लोक कामाला जातात त्यावेळी येथे वाहनांची गर्दी होऊन रस्ता ब्लॉक होतो. या नवीन होऊ घातलेल्या जंक्शनचे नवीन प्रवेशद्वार सध्याच्या रस्त्यांना जोडले जाणार आहे. गेट अशा ठिकाणी बांधले गेले आहे जिथे रस्त्याची स्थिती वाईट आहे आणि वाहतूक कोंडी मोठी आहे, त्यामुळे जंक्शनवर चारही दिशांनी वाहतूक होते आणि सध्या वाहतूक नियंत्रित करण्यासाठी कोणतेही ट्रॅफिक सिग्नल नाहीत. जंक्शनवरील प्रवेशद्वार त्रासात भर घालेल कारण वाहने रस्त्याच्या कडेला थांबून प्रवाशी चढ-उतर करतील. रस्ते अरुंद असल्याने आणखी वाहतूक कोंडी होईल. माउंट व्हर्ट, प्रिस्टीन, औंधरोड, चिखलवाडी, बोपोडी, दापोडी यासंह आजूबाजूच्या नागरिकांना याचा त्रास होईल. या भागातील जवळपास ५० हजार लोकांच्या वाहतुकीच्या समस्या पुन्हा अधिक तीव्रतेने वाढतील. त्यामुळे या जंक्शनचे प्रवेशद्वार येथे बांधताना याबाबत विचार करणे आवश्यक होते. त्यामुळे स्थानिकांना विश्वासात घेऊन याबाबतचा तोडगा लवकरात लवकर काढावा अशी विनंती सुनील माने यांनी केली आहे. येत्या काळात हा वाहतूक प्रश्न सुटला नाही तर आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
More Stories
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार – केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
पुण्यात प्राण्यांवरील अत्याचाराविरोधात जोरदार मोर्चा
“जैन धर्माच्या पवित्र जागेचा सौदा – ट्रस्टकडून बिल्डरच्या घशात जमीन घालण्याचा डाव!”