December 2, 2025

महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘विंग्स फॉर ड्रीम्स’तर्फे पुण्यात निषेध

राजेश घोडके
पुणे, २२ मार्च २०२५: “देश की शान, बेटी की जान”, “बेटी की कोई जाति नहीं होती, सिर्फ बेटी होती है” ,”ब्रेक द सायलेंस, एंड द व्हायोलन्स” आणि “बहुत हुआ बलात्कार, मत कर रे अत्याचार” अशा भावनिक घोषणा देत ‘विंग्स फॉर ड्रीम्स’ संस्थेतर्फे महिलांवरील वाढत्या अत्याचारांविरोधात एफसी रोडवर निदर्शन करण्यात आले.

या प्रसंगी महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. ही संस्था शिक्षण, महिला सक्षमीकरण, प्राणी कल्याण, पर्यावरण संरक्षण, अपघात प्रतिबंध आणि अनाथालयांना मदत यांसारख्या विविध क्षेत्रांत कार्यरत आहे. संस्थेचे मुख्य उद्दिष्ट समाजातील दुर्बल घटकांना सक्षम बनवणे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करणे हे आहे.

महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम, गृहउद्योग प्रोत्साहन आणि मासिक पाळी यांसारखे उपक्रम संस्थेतर्फे राबविण्यात येतात. गरजू मुलांना शिक्षण मिळावे यासाठी बालमजुरीतून सुटका, शालेय साहित्य वितरण आणि शिष्यवृत्ती देणे आहे अनेक कार्य करत आहे.

‘विंग्स फॉर ड्रीम्स’ने २०१९ पासून अनेक लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. संस्थेच्या कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली, महिलांना स्वावलंबनाची प्रेरणा मिळाली, अनेक बेवारस प्राण्यांना आधार मिळाला, रस्ते सुरक्षा जनजागृतीमुळे अपघातांचे प्रमाण कमी झाले आणि वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाला हातभार लागला.