पुणे : महिलेच्या बॅंक खात्यातून 63 हजार लंपास

पुणे, 14 जून 2021 : लष्कर भागातील एका एटीएम केंद्रातून पैसे न मिळाल्याने बॅंकेच्या ग्राहक सेवा केंद्रात संपर्क साधणाऱ्या महिलेच्या बॅंक खात्याची गोपनीय माहिती घेऊन चोरट्याने 63 हजारांची रोकड लांबविल्याची घटना उघडकीस आली.
याबाबत वानवडी भागातील एका महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार काही महिन्यांपूर्वी लष्कर भागातील महात्मा गांधी रस्त्यावरील एका बॅंकेच्या एटीएम केंद्रात गेल्या होत्या. एटीएम यंत्रातून पैसे न मिळाल्याने त्यांनी बॅंकेच्या ग्राहक सेवा केंद्रात संपर्क साधला. ग्राहक सेवा केंद्राऐवजी चोरट्याने त्याचा क्रमांक तेथे दिला होता. महिलेच्या निदर्शनास हा प्रकार आला नाही. महिलेच्या बॅंक खात्याची गोपनीय माहिती चोरट्याने घेतली. या माहिती गैरवापर करून चोरट्याने महिलेच्या खात्यातून 63,810 रुपये लांबविले. गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर तपास करत आहेत.