पुणे: बायकोनेच नवऱ्याचा खून करून मृतदेह फासावर लटकविला; मुलीने वाच्यता केल्यामुळे खूनाला फुटली वाचा

पुणे, दि. १५ जुलै २०२१- नवऱ्याच्या डोक्यात दांडक्याने मारहाण करून गळा आवळून खून करीत बायकोने त्याला गळफासाला लटकविले. त्यानंतर पतीने आत्महत्या केल्याचा बनाव करून दोन दिवस ती बाहेर गेली. मात्र अंत्यसंस्कारावेळी मुलीने बाबाला आईने मारल्याची माहिती नातेवाईकांना दिल्याने या खूनाला वाचा फुटली आहे.


दिपक बलवीर सोनार (वय ३६,रा. गुरुवार पेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी (दि.१२) रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी पत्नी राधिका दिपक सोनार (वय.३४,रा. गुरुवार पेठ) ताब्यात घेतले आहे.


दिपक सोनार रखवालदाराचे काम करत होता. तो गुरुवार पेठेतील एका वाड्यात पत्नी व मुलीसोबत राहायला होता. त्याची पत्नी राधिका कपड्याच्या दुकानात काम करते. दिपकला दारूचे व्यसन असल्यामुळे तो पत्नी कामावरून घरी रात्री उशीरा आल्यामुळे सतत संशय घेत होता. त्यामुळे त्यांच्यात सतत वाद होत होते. सोमवारी रात्री राधिका कामावरून आल्यानंतर त्यांच्यात वाद झाले. त्यावेळी तिने दिपकला बॅटने मारहाण केली. त्यानंतर त्याचा गळा दाबून खून केला.


पोलिसांना संशय येऊ नये म्हणून राधिकाने दिपकचा मृतदेह उचलून बाथरूमध्ये नेउन दोरीने लटकवला. त्यानंतर राधिका दोन दिवस घराबाहेर गेली. परत आल्यानंतर तिने पती दीपकने गळफास घेतल्याचा बनाव करून नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला होता. दरम्यान दीपकच्या अंत्यसंस्कारावेळी मुलीने तिच्या आईच्या कृत्याचा भांडाभोड करत तिनेच वडिलांचा खून केल्याचे नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी राधिकाला ताब्यात घेतले. पुढील तपास खडक पोलिस करत आहेत.