पुणे : लाच घेतल्याप्रकरणी पुणे महानगरपालिकेतील महिला अधिकाऱ्याला रंगेहात पकडले

पुणे, १४ जून २०२१- बांधकाम व्यावसायिकाकडून ५० हजारांची लाच घेणाऱ्या पुणे महानगरपालिकेतील महिला अधिकारी मंजुषा विधाते यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. त्या महापालिकेत तांत्रिक सल्लागार पदावर कार्यरत असून, येत्या ३० जूनला त्या सेवानिवृत्त होणार होत्या. त्यांच्याविरूद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या प्रकरणातील तक्रारदार यांचे टीडीआर संदर्भात एक प्रकरण महापालिकेत अडकले होते. संबंधित प्रकरण मंजुषा यांच्याकडे होते. त्यासंदर्भात त्यांनी तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाकडे ५० हजारांची लाच मागितली होती. त्यानुसार तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदविली होती. त्याची पडताळणी करून एसीबीने केलेल्या कारवाईत मंजुषा यांना रंगेहात पकडण्यात आले.