पुण्यात पोलीस ठाण्यातच महिलेने प्यायले फिनाईल, आयुक्तालयानंतर कोंढव्यात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे, २५/०८/२०२१: नोकरीसाठी चारित्र्य पडताळणीला वंâटाळून एकाने आयुक्तालयात पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना घरगुती वादातून महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिनाईल पिउन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ही घटना काल संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास ठाणे अमंलदार कक्षात घडली. याप्रकरणी संबंधित महिलेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अमंलदार येनभाउ भिलारे यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला आणि त्यांचा पती उमर शेख यांच्यात घरगुती कारणावरून भांडणे झाली होती. त्यामुळे दोघेही पती-पत्नी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आले होते. त्यावेळी महिलेने अचानकपणे पिशवीतून फिनाईलची बाटली काढून पित आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर तिची प्रकृती सुधारली असल्याची माहिती कोंढवा पोलिसांनी दिली आहे.