“जल जीवन मिशन ” अंतर्गत ची कामे मिशन मोड वर करा- जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख

पुणे दि. 11 : जल जीवन मिशन अंतर्गत पुणे जिल्हयातील विविध गावांत गतवर्षीसाठी दोन लाख नळ जोडण्या देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून हे उद्दिष्ट मिशन मोडवर साध्य करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. जिल्हयात जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत एकुण रूपये 2327.00 कोटी खर्च करून 1849 योजनांद्वारे पाणी पुरवठयाच्या विविध योजना राबविण्यात येणार आहेत.


जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत घेतलेल्या जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जिल्हा कृति आराखडा (सन 2021 ते 2023) व वार्षिक कृति आराखडा (सन 2021-2022) मंजुरी तसेच नळ पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा व स्व) श्री.मिलिंद टोणपे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता श्री. एन. एन. भोई व सौ. वैशाली आवटे ,वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. प्रमोद रेड्डी तसेच ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. सुरेंद्रकुमार कदम व श्री. आर. पी. कोळी उपस्थित होते.


या बैठकीमध्ये विविध विषयांवर सखोल चर्चा होऊन आढावा घेण्यात आला तसेच विविध बाबींचे नियोजन व उद्दिष्ट ठरविण्यात आले. सदर बैठकीत वार्षिक कृति आराखडयास मान्यता देऊन एकूण 22 योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली . सदर मिशन राबविण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने बाहयस्त्रोतातून 50 अभियंते कंत्राटी तत्वावर घेतले असून प्रत्येक जिल्हा परिषद गटासाठी एका अभियंत्याची नेमणूक केली आहे. तसेच नुकतेच 25 गावांसाठी एक अशा प्रकारे सर्व्हे टीम सुध्दा नेमलेले आहेत. येत्या 2 ऑक्टोंबर पर्यंत जास्तीत जास्त योजनांचे कार्यादेश देऊन कामे सुरू करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी डॉ. देशमुख म्हणाले, जल जीवन मिशन अंतर्गत “हर घर नल ” म्हणजेच प्रत्येक घराला घरगुती कार्यात्मक नळ जोडणीद्वारे 55 लिटर्स प्रति दिन प्रतिमाणशी शुध्द व नियमित पाणी पुरवठा करणे हा मूळ हेतू आहे. सदर हेतू साध्य करण्यासाठी पाटबंधारे विभाग,भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण इत्यादी सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि मिशन मोडवर आपआपल्या जबाबदा-या पूर्ण करण्याची गरज आहे.


जल जीवन मिशन कार्यक्रम यशस्वीरीत्या राबविण्यासाठी सर्व गावांचा लोकसहभाग महत्वाचा असून गावांनी आपले ‘गाव कृती आराखडे’ कोबो टोलच्या माध्यमातून सध्या जो पंधरवडा अभियान चालू आहे त्यामध्ये तयार करून जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनला सादर करणे जरुरी आहे. यासाठी गावातील ग्रामसेवक व सरपंच व ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे सदस्यांनी हिरीरीने सहभाग घेऊन सदरील गाव कृती आराखडे तातडीने सादर करणे आवश्यक आहे व सदरील गाव कृती आराखडा अंतिम झाल्यानंतर ग्रामसभेमध्ये त्यास मंजुरी देणे आवश्यक आहे. तसेच लोकवर्गणी गोळा करून गावाच्या स्वतंत्र खात्यात जमा करावयाची असून सदर रक्कम भविष्यात योजनेच्या देखभाल दुरुस्ती साठी वापरावयाचे धोरण आहे. शाळा, अंगणवाडयांना व इतर शासकीय इमारतींना प्राधान्याने 2 ऑक्टोंबर पर्यंत नळ जोडणी देण्याचे नियोजन विभागाने करावे, असे निर्देश ही डॉ. देशमुख यांनी दिले.