यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे पुण्यात भव्य ‘गावरान २०२२’ महोत्सवाचे आयोजन

पुणे, 30 नोव्हेंबर 2022 – यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे ‘गावरान २०२२’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सिंहगड रोडवरील अभिरुची मैदान येथे दिनांक २, ३ आणि ४ डिसेंबर रोजी हा महोत्सव पार पडणार आहे. या महोत्सवामध्ये ग्रामीण भागातील युवा आणि महिला उद्योजकांचे सुमारे दोनशे स्टॉल असतील. यामध्ये ग्रामीण भागातील उद्योजकांनी तयार केलेली विविध उत्पादने प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

वस्त्रे, खाद्यपदार्थ, गृहउपयोगी वस्तू, बागकाम व अन्य शेती विषयक उत्पादने, हस्तकला व कलेच्या इतर वस्तू तसेच ग्रामीण पद्धतीने बनविलेले चविष्ट खाद्यपदार्थ या महोत्सवात असणार आहेत, असे सुळे यांनी सांगितले. ग्रामीण भागातील उद्योजकांच्या दर्जेदार उत्पादनांची शहरी भागात विक्री व्हावी आणि ग्रामीण महिला व युवा स्टार्ट-अप उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे हा ‘गावरान २०२२’ महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे. यावर्षीच्या ‘गावरान २०२२’ महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे या महोत्सवात व्यवसाय क्षेत्राशी संबंधित अनेक विषय तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली असून त्यासाठी एक वेगळे व्यासपीठ महोत्सवाच्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे.

आगामी काळात गावरान महोत्सवांतर्गत जोडल्या गेलेल्या ग्रामीण युवा व महिला उद्योजकांना विविध व्यवसायाशी संबंधित मान्यवर तज्ज्ञांकडून वेळोवेळी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे. या ‘गावरान २०२२’ महोत्सवास मोठ्या संख्येने नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहन खा. सुप्रिया सुळे यांनी केले आहे . अधिक माहितीसाठी ९४०४७६४१७६, ९८८११४९३९६ या नंबरवर संपर्क साधावा किंवा https://www.chavancentre.org/announcement/organized-by-yashwantrao-chavan-center-gavran-2022-festival या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.