शहरात कालच्या पाऊसाने शंभरहून अधिक ठिकाणी झाडपडीच्या घटना

पुणे, ०१ ऑक्टोबर २०२२: पुणे – शहरात काल दिनांक ३०|०९| २०२२ रोजी दुपारी चार नंतर मुसळधार पाऊस व वारयाचा प्रचंड जोर असल्याने शहराच्या विविध ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या असून आज दिनांक ०१|१०|२०२२ रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत १०० झाडे पडल्याची तसेच अनेक ठिकाणी झाडपडीच्या किरकोळ घटनांची नोंद अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात झाली आहे.

धुवादार बरसणारा पाऊस व सोसाट्याचा वारा यामुळे कुठे रस्त्यावर तर कुठे वाहनावर व एखाद्या ठिकाणी घरावर झाड पडल्याचे दुरध्वनी अग्निशमन दलाकडे आले होते. नियंत्रण कक्षात कर्तव्य बजावणारे अधिकारी व जवान यांनी योग्य नियोजन करत अग्निशमन मुख्यालय व इतर अग्निशमन केंद्र अशा एकूण २० केंद्रातील अग्निशमन वाहने व रेस्क्यु व्हॅन वेळेत रवाना केल्या. तसेच दलाचे सर्व अधिकारी व जवान यांनी प्रत्येक ठिकाणी तत्परतेने काम करत चेन सॉ, रश्शी, ट्रि पुनर अशी वेगवेगळी अग्निशमन उपकरण वापरून झाडे हटवण्याचे कार्य पार पाडले असून अजून ही बरयाच ठिकाणी जवान काम करीत आहेत.