नऱ्हे परिसरातील सोसायटीच्या टाकीत पडून तरुणाचा मृत्यू

पुणे, ३१ मे २०२१: शहरातील सिंहगड रस्ता भागातील नऱ्हे परिसरात सोसायटीच्या टाकीत पडून तरुणाचा मृत्यू झाला आहे. विठ्ठल अंकुश वायकुळे (वय ३०, रा. पार्थवी सोसायटी, नऱ्हे) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे.

वायकुळे मूळचा लातूरचा असून वारजे भागातील एका औषध निर्माण कंपनीत कामाला होता. पार्थवी सोसायटीतील सदनिकेत तो दोन मित्रांबरोबर राहत होता. काल दुपारी वायकुळे सोसायटीतील पाण्याचा टाकीत पडल्याची घटना उघडकीस आली. त्याच्या मित्राने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार सिंहगड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणसे यांनी घटनास्थळी भेट दिली.

दरम्यान, शनिवारी (दि.२९ ) रात्री वायकुळे मित्राकडे पार्टी करायला गेला होता. तेथून मध्यरात्री तो नऱ्हे भागातील सोसायटीत परतला होता. तो सोसायटीच्या टाकीत नेमका कसा पडला, याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.