September 24, 2025

पीएमडीटीए मानांकन मर्क्युरी फाउंडेशन करंडक 14 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत युगंधर शास्त्री, प्रार्थना खेडकर यांना विजेतेपद

पुणे, 11 जानेवारी 2024: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे पीएमडीटीए मानांकन मर्क्युरी फाउंडेशन करंडक 14 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात युगंधर शास्त्री याने तर, मुलींच्या गटात प्रार्थना खेडकर या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

चिंचवड गाव येथील मोरया गोसावी टेनिस अकादमी टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात अंतिम फेरीत युगंधर शास्त्री याने आदित्य वाडकरचा 5-3, 2-4, 5-3 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. युगंधर शात्री पोदार इंटरनॅशनल शाळेत सातवी इयत्तेत शिकत असून मोरया गोसावी टेनिस अकादमीत प्रशिक्षक शशिकांत चौतमल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.

मुलींच्या गटात अंतिम लढतीत दुसऱ्या मानांकित प्रार्थना खेडकर हिने चौथ्या मानांकित ओवी मारणेचा 4-2, 4-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण विधान परिषद आमदार उमा खापरे, जयदीप खापरे, माजी नगरसेविका शीतल शिंदे, अनिरुद्ध संकपाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शशिकांत चौतमल आणि स्पर्धा निरीक्षक सरदार ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

निकाल: 14 वर्षाखालील मुली: उपांत्य फेरी:
ओवी मारणे(4) वि.वि.सान्वी राजू(1) 7-5;
प्रार्थना खेडकर(2) वि.वि.शर्मिष्ठा कोद्रे 7-1;
अंतिम फेरी: प्रार्थना खेडकर(2) वि.वि.ओवी मारणे(4) 4-2, 4-1;

14 वर्षाखालील मुले: उपांत्य फेरी:
युगंधर शास्त्री वि.वि.ओम कलशेट्टी 7-2;
आदित्य वाडकर पुढे चाल वि.अद्वैत गुंड;
अंतिम फेरी: युगंधर शास्त्री वि.वि.आदित्य वाडकर 5-3, 2-4, 5-3.