मुंबई, ११ जुलै २०२५: महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद क्षण ठरला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे प्रतीक असलेल्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि स्थापत्य वारशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अधिकृत ट्विटर (X) अकाउंटवरून ही माहिती देत सर्व शिवप्रेमींना आणि महाराष्ट्रातील जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. “आपले आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांना महाराष्ट्र सरकारचा मानाचा मुजरा! छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत! हे सांगताना अतिशय आनंद होतो.”
या १२ किल्ल्यांमध्ये महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे. या सर्व किल्ल्यांचे ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ म्हणून युनेस्कोने गौरव केला आहे.
फडणवीस यांनी सांगितले की, हे किल्ले केवळ संरक्षणात्मक वास्तू नसून, महाराजांनी स्वराज्यासाठी उभारलेली एक अद्वितीय लष्करी संरचना आहे. या किल्ल्यांतील माची स्थापत्य, शत्रूला चकवणारे दरवाजे, स्थानिक भौगोलिक रचनेशी सुसंगत बांधकाम, हे मराठा स्थापत्यशास्त्राचे जागतिकदृष्ट्या मान्यताप्राप्त उदाहरण बनले आहे.
या ऐतिहासिक यशासाठी केंद्र सरकार आणि विविध संस्थांचा मोलाचा सहभाग राहिला. “मी सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. केंद्र सरकारच्या सक्रिय सहभागामुळे हे शक्य झाले,” असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, संस्कृती मंत्रालय, भारताचे युनेस्कोमधील राजदूत विशाल शर्मा, संचालक हेमंत दळवी, अपर मुख्य सचिव विकास खारगे यांचे त्यांनी विशेष उल्लेख केले.
राजकीय पातळीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री आशिष शेलार यांचे योगदानही फडणवीस यांनी अधोरेखित केले. “शेलार यांनी युनेस्कोच्या महानिदेशकांची भेट घेऊन तांत्रिक सादरीकरण केले, ज्याचा मोठा फायदा झाला,” असे ते म्हणाले.
हा निर्णय महाराष्ट्राच्या वारशाला जागतिक ओळख मिळवून देणारा आहे. राज्य सरकारने यामुळे पर्यटन, जतन आणि संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
More Stories
चांदणी चौक ते जांभुळ वाडी, जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल महिनाभरात तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार
पावसामुळे हैराण धानोरी, वडगावशेरी, खराडी परिसर; आमदार बापूसाहेब पठारे यांची अधिवेशनात ठोस उपाययोजनांची मागणी
पुणे: महाराष्ट्र शासन शहरात कर्करोग रुग्णालय कधी उभारणार; आमदार पठारे यांची मागणी