November 18, 2025

Pune: पदवीधर-शिक्षक मतदार नोंदणीसाठी ६ नोव्हेंबरपर्यंत मुदत : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. ०३/११/२०२५: जिल्ह्यातील पदवीधर व मान्यताप्राप्त माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांनी मतदार नोंदणीसाठी येत्या ६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणीच्या प्रगतीचा आढावा घेतला. या बैठकीस निवडणूक उपजिल्हाधिकारी मीनल कळसकर, तसेच जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी व तहसीलदार उपस्थित होते.

जिल्ह्यातील एकही शासकीय अधिकारी वा कर्मचारी पदवीधर मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये, यासाठी तालुकास्तरावर मिशन मोडमध्ये नोंदणी मोहीम राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यासाठी प्रांताधिकारी यांनी तात्काळ तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रलंबित नोंदणी पूर्ण करण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

पदवीधर मतदार नोंदणीसाठी राजकीय पक्ष, महाविद्यालये तसेच शैक्षणिक संस्था यांचे सहकार्य घेण्याचे निर्देश देत, शिक्षकांनाही पदवीधर मतदार म्हणून नोंदविण्यावर भर द्यावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची माहिती घेऊन नोंदणी करावी आणि एकही शिक्षक नोंदणीपासून वंचित राहू नये, यासाठी प्राचार्य व मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.