October 5, 2024

सारसबाग गणपती मंदिरात 350 युवतींच्या बर्ची नृत्याने गणेशोत्सवाला मानवंदना

पुणे, 5 सप्टेंबर 2024 – सारसबाग गणपती मंदिरात 1 सप्टेंबर रोजी 350 युवतींच्या गटाने उत्साहपूर्ण सादरीकरण करत लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी जोरदार मानवंदना दिली. बर्ची नृत्य, लेझिम, कलरी पयट्टू, पताका, आणि ढोल-ताशांच्या वादनाने वातावरण भारावून गेले.

ज्ञान प्रबोधिनीच्या युवती विभागाने हे भव्य सादरीकरण केले. 1986-87 मध्ये, कै. आप्पा पेंडसे यांनी 1965 मध्ये स्थापन केलेल्या युवक गटाच्या प्रेरणेने फक्त युवतींना एकत्र करून बर्ची नृत्य पथकाची स्थापना केली होती. गेल्या 37 वर्षांपासून हे पथक शिस्तबद्ध नृत्य आणि वादनाच्या माध्यमातून सामाजिक सहभागासह शौर्याची भावना जागवते आहे.

या अनोख्या कार्यक्रमात 200 शालेय आणि 150 महाविद्यालयीन युवतींनी सहभाग घेतला. प्रेक्षकांनीही शेवटच्या टप्प्यात या शिस्तबद्ध संचामध्ये सहभागी होत गणेशोत्सवाच्या उत्साहात रंग भरला. ज्ञान प्रबोधिनी ही संस्था मागील 50 वर्षांपासून शिस्तबद्ध मिरवणूक आणि सामाजिक शिस्तीचा प्रचार करत असून, यंदाच्या वर्षीचं सारसबागेतील सादरीकरण एक विशेष आकर्षण ठरले.