October 22, 2025

काश्मीरमध्ये हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी स्वराज पार्टीचे धनंजय जाधवकडून मदतीचा हात पुढे

पुणे/श्रीनगर, २३ एप्रिल २०२५: काश्मीरमधील पेहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीनगरमध्ये असलेल्या स्वराज पार्टीचे धनंजय जाधव आणि त्यांची पत्नी पूजा यांनी महाराष्ट्रातील पर्यटकांना मदतीचा हात पुढे केला आहे. लग्नानंतर फिरायला म्हणून श्रीनगर येथे दाखल झालेले हे दांपत्य सध्या 15 कोर मेडिकल हेडक्वार्टर, श्रीनगर येथील आर्मी कॉन्टोन्मेंटमध्ये आहे.

हल्ल्याची माहिती मिळताच, महाराष्ट्रातील एका आर्मी ऑफिसरच्या मदतीने त्यांनी या ठिकाणी प्रवेशासाठी पास मिळवला. देशाचे गृहमंत्री अमित शहा देखील काल या कॉन्टोन्मेंटमध्ये सुरक्षा आढावा घेण्यासाठी आले होते. या ठिकाणी शहीद पर्यटकांची शवपेट्या आणल्या जात असून, जखमी पर्यटकांवर आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

धनंजय जाधव यांनी भावनिक आवाहन करत म्हटले आहे की, “या कठीण काळात आपण सर्वांनी एकमेकांना साथ द्यावी. आम्ही येत्या पाच दिवसांत इथेच असणार आहोत. महाराष्ट्रातील कोणत्याही पर्यटकाला किंवा त्यांच्या नातेवाईकांना मदतीची गरज भासल्यास आमच्याशी संपर्क साधावा.” त्यांनी एक व्हॉट्सअॅप नंबर दिला असून, त्यावरून संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

जाधव यांनी स्पष्ट केले की, ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्थानिक आर्मी अधिकारी आणि हॉस्पिटल प्रशासन यांच्या सतत संपर्कात आहेत. मृतांना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.