May 15, 2025

पुणे: महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची गरज, औंध जलतरण तलाव लवकर खुला, मुळा-मुठा जलपर्णी हटविण्यावर भर – आमदार शिरोळे

पुणे, २३ एप्रिल २०२५: पुण्यात महापालिकेच्या रुग्णालयांच्या कार्यक्षमतेसाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे, औंधचा जलतरण तलाव नागरिकांसाठी लवकरच खुला होणार असून मुळा-मुठा नद्यांतील जलपर्णी तातडीने हटविण्याची कार्यवाही सुरू आहे. हे तीनही मुद्दे शिवाजीनगरचे भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी बुधवारी संबंधित विभागांशी बैठक घेऊन उपस्थित केले.

शिरोळे यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन होमी भाभा, संजय गांधी, खेडेकर, शेवाळे आणि दळवी रुग्णालयांमधील अडचणी व सुधारणा यावर चर्चा केली. त्यांनी विशेष वैद्यकीय तज्ज्ञांची नेमणूक करावी, मॅटर्निटी वॉर्ड तातडीने सुरू करावेत, अशा सूचना केल्या. होमी भाभा हॉस्पिटलचे नूतनीकरण जुलैपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

औंधमधील महापालिकेचा जलतरण तलाव नागरिकांच्या सततच्या मागणीनंतर लवकरच सुरू करण्यात येणार आहे. खेळाडूंना सरावासाठी होणाऱ्या अडचणी लक्षात घेता, जलतरण तलावातील लाईफ गार्ड्स, पाण्याची स्वच्छता यांची माहिती आमदार शिरोळे यांनी घेतली आणि तत्काळ सुरुवात करण्याचे आदेश दिले.

मुळा आणि मुठा नद्यांतील येरवडा व बोपोडी परिसरात जलपर्णीची वाढ मोठ्या प्रमाणात झाल्याने पर्यावरण संवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठकीत शिरोळे यांनी ती तातडीने हटविण्याच्या सूचना दिल्या. संबंधित ठेकेदारांची नेमणूक झाली असून काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली.