November 5, 2025

पुणे: बोपखेल माध्यमिक विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के; काजल कोहलीचा शाळेत प्रथम क्रमांक

बोपखेल, १३ मे २०२५: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या फुगेवाडी भागशाळा बोपखेल येथील माध्यमिक विद्यालयाने यंदाही आपली यशाची परंपरा कायम राखत सलग नवव्या वर्षी दहावीचा १००% निकाल लागवला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी आज जाहीर केलेल्या निकालात एकूण ५६ विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश मिळवले.

या यशात काजल कोहली हिने सर्वाधिक ८९% गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. काजल ही कामगार कुटुंबातील असून, आपल्या सातत्यपूर्ण अभ्यास आणि चिकाटीच्या जोरावर तिने हे यश मिळवले आहे.

महापालिकेच्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत ८५ ते ९०% गुण मिळवणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी ₹५०,००० तर ८० ते ८५% गुण मिळवणाऱ्या चार विद्यार्थ्यांना प्रत्येकी ₹२५,००० चे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

विद्यालयाच्या यशामागे शिक्षकांचा मोलाचा वाटा असून, विद्यार्थ्यांना अभ्यासात मार्गदर्शन करण्यासाठी सोनटक्के, कासले आणि सलगर या शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली. शालेय शिक्षणाबरोबरच प्लंबिंग व एप्रिल हे व्यावसायिक अभ्यासक्रमही शाळेत राबवले जात आहेत.

रेवा एनजीओचे सहकार्याने शाळेत आधुनिक संगणक लॅब सुरू करण्यात आली असून, रेवा एनजीओचे राहुल डोलारे म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे पाहून शिक्षक म्हणून आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो.”

विद्यालयाचे प्रमुख कराड आदिनाथ शहादेव यांनी सांगितले की, “२०१६ मध्ये केवळ ३५ विद्यार्थ्यांनी सुरुवात केली होती, आज १५० हून अधिक विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. निकालाची परंपरा पुढेही कायम ठेवत आम्ही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू.”

शाळेतील अनेक माजी विद्यार्थी आज सिव्हिल व मेकॅनिकल इंजिनीअर, पोलीस, सरकारी सेवक आणि विविध व्यावसायिक क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत.