June 22, 2025

पुणे: मावळातील तिकोना गावात वन्यप्राण्याच्या बेकायदेशीर शिकारीचा पर्दाफाश, शस्त्रसाठ्यासह आरोपी अटकेत

मावळ, १३ मे २०२५: मावळ तालुक्यातील तिकोना गावात वन्यप्राण्याच्या बेकायदेशीर शिकारीच्या गुप्त माहितीनंतर पुणे वनविभागाने मोठी कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. दिनांक 13 मे रोजी सकाळी सिंग बंगला, तिकोना येथे वनविभागाच्या विशेष पथकाने छापा टाकून आरोपी सुखमित हरमित सिंग भुतालिया (वय 26, रा. तिकोना) याच्या ताब्यातून तब्बल ५२ किलो वन्यप्राणी सदृश मांस, दोन बंदुका, जिवंत आणि वापरलेली काडतूसे तसेच शिकार व सोलणीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले.

या प्रकरणात वन्यजीव संरक्षण अधिनियम, 1972 च्या कलम 9 व 51 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, आरोपीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जात आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

ही कारवाई पुणे उपवनसंरक्षक श्री. तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक श्री. मंगेश ताटे यांच्या नेतृत्वात पार पडली. कारवाईमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. प्रकाश शिंदे (वडगाव), वनपाल श्रीमती सीमा पालोदकर (देवले), श्री. गणेश म्हेत्रे (खंडाळा), वनरक्षक श्री. संदीप अरुण (चावसार) व श्रीमती शेळके (देवले) यांनी सहभाग घेतला.

संपूर्ण तपास प्रक्रिया अत्यंत गोपनीयपणे पार पडली असून, जप्त केलेल्या मांसाचा नमुना तपासणीसाठी गोरेवाडा (नागपूर) येथील वन्यजीव संशोधन केंद्रात पाठवण्यात आला आहे. शस्त्र व काडतुसांविषयी पुढील तपासासाठी पोलिस विभागाशी समन्वय साधण्यात येत आहे.