November 5, 2025

प्राण्यांच्या सन्मानार्थ पुण्यात ‘नॅशनल अ‍ॅनिमल राइट्स डे’ निमित्त भावनिक श्रध्दांजली

काजल भुकन
पुणे, १ जून २०२५: मानवी गरजांसाठी अन्न, वस्त्र, औषध, करमणूक आणि वैज्ञानिक प्रयोगांसाठी दरवर्षी अब्जावधी प्राणी मृत्युमुखी पडतात. मानवाच्या स्वार्थासाठी मृत्युमुखी पडलेल्या प्राण्यांच्या वेदनांकडे समाजाचे दुर्लक्ष होते आणि त्यांना मृत्यूनंतरही कधीच सन्मानाने श्रद्धांजली अर्पण केली जात नाही. या दुर्लक्षित जीवांच्या सन्मानार्थ ‘नॅशनल अ‍ॅनिमल राइट्स डे’ (National Animal Rights Day – NARD) च्या निमित्ताने पुण्यात रविवार, १ जून रोजी दुपारी १२ वाजता, जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानासमोर एक भावनिक आणि आगळावेगळा अंत्यविधी आयोजित करण्यात आला.

‘पुणे अ‍ॅनिमल लिबरेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यक्रमात काळ्या पोशाखात असलेल्या स्वयंसेवकांनी मांस, दुग्धोत्पादन, प्रयोगशाळा आणि फॅशन उद्योगांमध्ये मारल्या गेलेल्या प्राण्यांचे अवशेष अत्यंत सन्मानाने ठेवले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी प्राण्यांच्या अवशेषांच्या आजूबाजूला अगरबत्ती, धूप आणि मेणबत्त्या प्रज्वलित करण्यात आल्या होत्या, ज्यामुळे संपूर्ण परिसरात एक शांत, गंभीर आणि भावस्पर्शी वातावरण निर्माण झाले होते. हे दृश्य निसर्ग आणि जीवांच्या सन्मानाची जाणीव करून देणारे ठरले.

कार्यक्रमाची सुरुवात श्रद्धांजलीने झाली. यानंतर, ‘डेक्लरेशन ऑफ अ‍ॅनिमल राइट्स’ (Declaration of Animal Rights) चे वाचन करण्यात आले. भावनिक भाषणांद्वारे प्राण्यांप्रती करुणा, समानता आणि नैतिकतेच्या मूल्यांची जाणीव करून देण्यात आली. कार्यक्रमादरम्यान काही काळ मौन पाळून या प्राण्यांच्या वेदनांना मानवंदना देण्यात आली.

यानंतर, जे. एम. रोडवरून शांततामय रॅली काढण्यात आली. “करुणा हे नवे नैतिक मूल्य असावे”, “प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे”, “क्रौर्याला नाही म्हणूया”, अशा घोषणा देत नागरिकांना जागृत करण्याचा प्रयत्न झाला. या रॅलीत अनेक पुणेकर, प्राणीप्रेमी, विद्यार्थी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

स्वयंसेवक कालिंदी निकम म्हणाल्या, “प्रत्येक वर्षी असंख्य प्राणी मानवी स्वार्थामुळे मृत्युमुखी पडतात. याला आळा घालायचा असेल, तर आपल्याला शाकाहारी किंवा व्हेगन जीवनशैली स्वीकारावी लागेल. ही रॅली आणि अंत्यविधी जनजागृतीचं साधन आहे.”

कार्यक्रमाच्या मुख्य आयोजिका सई मनाकांत यांनी सांगितलं, “वनस्पतीआधारित अन्न स्वीकारल्यास केवळ प्राण्यांचा संहार टळतो असं नाही, तर त्यांना संपूर्ण जीवनभर भोगावी लागणारी वेदनाही थांबते. लोकांनी निर्दयतेविरहित पर्याय निवडणं ही काळाची गरज आहे.”

या कार्यक्रमात वर्षभर प्राणीहक्कांसाठी जगभरात झालेल्या चळवळींची माहितीही मांडण्यात आली. हा कार्यक्रम केवळ निषेध नव्हता, तर शोक, करुणा आणि सामाजिक जागरूकता यांचं प्रतीक होता. विशेष बाब म्हणजे, कार्यक्रमात वापरलेले प्राणी विकत घेतलेले नव्हते; ते मृतावस्थेत सापडलेले किंवा संस्थेकडे जाणीवपूर्वक सोपवले गेले होते.

‘नॅशनल अ‍ॅनिमल राइट्स डे’ जगभरात १०० हून अधिक शहरांमध्ये साजरा केला जातो. पुण्यातील हा उपक्रम पूर्णपणे शांततामय होता आणि कोणत्याही राजकीय किंवा धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू त्यामागे नव्हता.

हा अनुभव पुणेकरांसाठी अगला वेगळा करणारा ठरला. मानवी क्रौर्य, प्राण्यांचं दुःख आणि सहानुभूती यांच्याबाबत नव्याने विचार करायला लावणारा हा कार्यक्रम, प्राणीमित्रांसाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरला.