September 12, 2025

तीन खून प्रकरणाचा उलगडा; पुणे ग्रामीण पोलीसांची धडक कारवाई, आरोपीला केली अटक

पुणे, ७ जून २०२५ : पुणे ग्रामीण जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या एका महिले आणि दोन बालकांच्या मृतदेहांच्या तिहेरी हत्येचा पुणे ग्रामीण पोलिसांनी तपास करून अवघ्या काही दिवसांत आरोपीला गजाआड केले आहे. या कारवाईमुळे नव्याने पदभार स्वीकारलेल्या पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या नेतृत्वात पोलिसांची ही पहिली मोठी यशस्वी मोहीम ठरली आहे.

मृतदेह अनोळखी, तपासाला सुरुवात :
२५ मे २०२५ रोजी रांजणगाव गणपती गावाजवळील पुणे-नगर महामार्गालगत असलेल्या बंद ग्रोवेल कंपनीजवळ एका महिलेबरोबर दोन लहान मुलांचे अंशतः जळालेले मृतदेह आढळले. याप्रकरणी पोलीस नाईक गुलाबराव येळे यांनी सरकारी फिर्याद दिली. मृतदेह अनोळखी असल्यामुळे तपास अत्यंत गुंतागुंतीचा होता.

राज्यभर शोधमोहीम, हजारो सीसीटीव्ही फुटेज आणि नागरिकांची चौकशी –
पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली ७ विशेष तपास पथके तयार करण्यात आली. २५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. पुणे-नगर महामार्गावरील वाघोळी ते राहुरी दरम्यान, तसेच रांजणगाव, तळेगाव, चाकण, सुपा औद्योगिक परिसरातील कामगार व रहिवाशांची माहिती घेतली गेली. मृत महिलेच्या हातावर असलेल्या “जयभीम”, “Rajratan”, “mom dad”, “RS” अशा टॅटूच्या आधारावरही ओळख पटविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

बीड जिल्ह्यात मिळाला शोधाचा धागा –
पाच दिवसांपूर्वी संदीपसिंह गिल्ल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील ३३ पोलीस ठाण्यांतील आणि स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ६ तपास पथके संपूर्ण महाराष्ट्रात पाठवण्यात आली. बीड जिल्ह्यातील माजलगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या महिलेसंबंधीच्या ‘मिसिंग’ नोंदीच्या आधारे महिलेची ओळख पटली. तिचे नाव स्वाती केशव सोनवणे (२५) असून ती तिच्या दोन मुलांसह (स्वराज, वय २ आणि विराज, वय १) हरवली होती.

आरोपीने प्रेमसंबंधातून केला तिहेरी खून-
तपासात निष्पन्न झाले की, आरोपी गोरख पोपट बोखारे (३६) याचे स्वातीशी प्रेमसंबंध होते. ती त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. त्यामुळे २३ मे रोजी रात्री आळंदी येथून मोटारसायकलवरून तिघांना घेऊन जात असताना, गोरखने पुणे-नगर महामार्गालगत स्वाती व तिच्या दोन मुलांचा गळा दाबून व दगडाने ठेचून खून केला आणि पेट्रोल टाकून मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

आरोपीला पोलीस कोठडी :
गोरख पोपट बोखारे याला अटक करून रांजणगाव एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. न्यायालयाने त्याला ११ जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

कामगिरीत सहभागी अधिकारी –
या गुन्ह्याच्या तपासात पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, गणेश बिरादार, एसडीपीओ प्रशांत ढोले, बापूराव दडस, स्था. गु. शाखा निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्यासह ६० हून अधिक पोलीस कर्मचारी सहभागी होते.

पुणे ग्रामीण पोलिसांची ही यशस्वी तपास मोहीम हे त्यांचं नियोजनबद्ध आणि समन्वयात्मक कामकाजाचे ठोस उदाहरण ठरले आहे.