पुणे, ११ जून २०२५ : भारतीय वायुसेनेतील ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे लवकरच ‘एक्सियम-४’ या अंतराळ मोहिमेद्वारे स्पेसमध्ये झेपावणार असून, ते स्पेसमध्ये जाणारे दुसरे भारतीय नागरिक ठरणार आहेत. ही मोहीम भारतासाठी शास्त्रीय आणि सामरिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे मत खगोल अभ्यासक डॉ. लीना बोकील यांनी व्यक्त केले.
अमेरिकेतील एक्सियम स्पेस, नासा आणि स्पेसएक्स यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवली जात असून, त्यामध्ये एकूण चार अंतराळवीर सहभागी होणार आहेत. रॉकेट प्रक्षेपणानंतर सुमारे २८ तासांच्या प्रवासानंतर हे अंतराळवीर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) वर पोहोचतील. तेथे विविध शास्त्रीय व जैववैद्यकीय प्रयोग पार पडणार असून, ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्यावर काही महत्त्वाच्या प्रयोगांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
या मोहिमेविषयी माहिती देताना डॉ. लीना बोकील म्हणाल्या, “शुक्ला यांनी अंतराळ प्रवासासाठी आवश्यक असलेले सर्व प्रशिक्षण पूर्ण केले असून, त्यांचा सहभाग ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे. ही मोहीम केवळ तांत्रिक प्रगती नव्हे तर भारताच्या अंतराळ क्षेत्रातील सामर्थ्याचं प्रतीक ठरेल.”
शुक्ला यांचे प्रयोग प्रामुख्याने गुरुत्वशून्यतेमधील जैविक बदल, अन्न-संवेदन चाचण्या, तसेच प्रगत यंत्रणांची कार्यकारण चाचणी यावर आधारित असतील. त्यांचा अनुभव भारताच्या भविष्यातील मानवयुक्त अंतराळ मोहिमांसाठी मोलाचा ठरणार आहे.
गौरवाची बाब म्हणजे, शुभांशू शुक्ला हे १९८४ मध्ये रशियन अंतराळ मोहिमेत सहभागी झालेले विंग कमांडर राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात झेपावणारे दुसरे भारतीय नागरिक असतील.
ठळक मुद्दे :
-चार अंतराळवीरांसह ‘एक्सियम-४’ मिशन ISS वर रवाना
-२८ तासांचा अवकाश प्रवास, विविध वैज्ञानिक प्रयोग
-ग्रुप कॅप्टन शुक्ला यांची प्रमुख प्रयोगात्मक जबाबदारी
-भारताच्या अंतराळ मोहिमांना चालना मिळण्याची अपेक्षा
‘एक्सियम-४’ मोहीम केवळ एक वैज्ञानिक झेप नसून, भारताच्या आत्मनिर्भर अंतराळ कार्यक्रमासाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरणार आहे. ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या सहभागामुळे भारताचे जागतिक अवकाश क्षेत्रात योगदान अधिक दृढ होणार आहे.
More Stories
महापालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम; ५००० चौ.फुट बांधकाम जमीनदोस्त
Pune: प्रभाग रचनेवरून सुनावणीमध्ये गोंधळ
चांदणी चौक ते जांभुळ वाडी, जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल महिनाभरात तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार