मुंबई, १० जून २०२५: पुणे महानगरपालिकेने शहरातील पाणीपुरवठा योग्य प्रमाणात होण्यासाठी सन-२०१८ मध्ये २४x७ योजना आणून देखील अद्याप कात्रज, कोंढवा, येवलेवाडी, पिसोळी या विभागात अपुऱ्या प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. शहरात अनेक ठिकाणी अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना आंदोलन करावे लागत आहे. ही बाब गंभीर असून पुणे महापालिकाहद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना तातडीने योग्य प्रमाणात पाणी पुरवठा होईल या दृष्टिने कार्यवाही करण्यात यावी, असे निदेश महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले.
विधानपरिषदेचे सदस्य आमदार योगेश टिळेकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025 मध्ये “लक्षवेधी” च्या माध्यमातून या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. यासंदर्भात सदस्यांनी मागणी केल्यानंतर सभापती महोदयांनी आपल्या दालनात बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज याबाबतची बैठक घेण्यात आली, त्यावेळी हे निदेश देण्यात आले.
या बैठकीस विधानपरिषदेचे सदस्य आमदार योगेश टिळेकर, विधानमंडळाचे सचिव (3) डॉ. विलास आठवले, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम (दूरदृष्य प्रणालीद्वारे), अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उप सचिव नगरविकास प्रियंका छापवाले उपस्थित होते.
सद्य:स्थितीत पुणे मनपास 14 टीएमसी पाणी देण्याचा करार करण्यात आला आहे. नवीन 34 गावांकरीता पाणी पुरवठा योजना तयार करतांना 21 टीएमसी उपलब्ध करुन देण्याचा करार करावा. सन 2018 मध्ये सुरु झालेली ही पाणी पुरवठा योजना अद्याप अपुरी असून गांभीर्याने नियोजन करुन लवकरात लवकर हा पाणी प्रश्न सोडवावा असे निदेश विधानपरिषदेचे सदस्य आमदार योगेश टिळेकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांनंतर सभापती महोदयांनी दिले.
More Stories
पुणे मेट्रोचे खडकी स्थानक उद्यापासून प्रवासी सेवेत
संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पुण्याकडे प्रस्थान; हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तिरसात न्हालं वातावरण
‘विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी मत नोंदवावे -विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार