पिंपरी-चिंचवड, ५ जुलै २०२५: वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे व मामुर्डी परिसरातील अंडरपास भागात निर्माण होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी महत्त्वपूर्ण आढावा बैठक आज भाजपचे चिंचवड आमदार शंकर जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील ९.७ किमी लांबीच्या सेवा रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण आणि देखभाल यासाठीची ही बैठक ठरली निर्णायक. एक वर्षाच्या आत काम पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
बैठकीत आ. जगताप यांनी सेवा रस्त्यांचे महत्त्व अधोरेखित करताना अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, ही कामे प्राधान्याने आणि तातडीने हाती घेतली जावीत. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी हिंजवडी सयाजी हॉटेल, भूमकर चौक, ताथवडे, पुनावळे, रावेत-समीर लॉन्स, पवना नदी परिसर, मुकाई चौक व ताथवडे येथे “पुश बॅक स्ट्रक्चर” तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
कामाच्या कालावधीत नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समन्वयाने पीक्यूसी कॉंक्रिट रस्त्यांची कामे वेगाने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.
या बैठकीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, वरिष्ठ अभियंता सुभाष घंटे, अभियंता ओंकार जगदाळे, सल्लागार संस्था प्रतिनिधी परमेश्वर अरवतकर, अनंत कुलकर्णी, राकेश कोळी (रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर), तसेच हरेन यादव व विक्रम पाटील (डीएमआर इन्फ्रा) हे उपस्थित होते. महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुनील शिंदे, उपअभियंते रवींद्र सूर्यवंशी, चंद्रकांत मोरे आणि सल्लागार इन्फ्राकिंग यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारीही बैठकीला हजर होते.
आमदार जगताप म्हणाले, “या भागातील वाढत्या वाहतूक समस्यांवर ठोस उपाय म्हणून घेतलेल्या या निर्णयांमुळे नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा मिळणार आहे. कामांची गुणवत्ता आणि गती यावर आमदार कार्यालयाचं नियमित निरीक्षण राहील.”
More Stories
Pune: चाकण भागातील सव्वादोनशे अतिक्रमणावर हातोडा
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १४१ शाळांमध्ये आफ्टर-स्कूल मॉडेलची सुरुवात
PCMC: ३० सप्टेंबरपूर्वी ऑनलाइन मालमत्ता कर भरा आणि मिळवा ४ टक्के सवलत!