पुणे, २९/१०/२०२५: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १९ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेची घोषणा करण्यात आली. यावेळी या स्पर्धेचे बोधचिन्ह, जर्सीचे अनावरण करण्यात आले तर शुभंकर प्रदर्शित करण्यात आले. या ऐतिहासिक स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, युसीआय (Union Cycliste International) आणि इतर संबंधित संस्थांसोबत समन्वय साधून काम सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे येथे सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, आशियाई सायकलिंग महासंघ, युसीआय, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांनी संयुक्त विद्यामाने आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी आशियाई सायकलिंग महासंघाचे अध्यक्ष तथा युसीआयचे उपाध्यक्ष दातो अमरजीत सिंग गिल, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव दातो मनिंदर पाल सिंग, पीजीटीचे तांत्रिक संचालक पीनासी बायसेक उपस्थित होते.
डुडी म्हणाले, या स्पर्धेची एकूण लांबी ४३७ किलोमीटर असून सुमारे २५० गावांचा या मार्गात समावेश आहे. संपूर्ण स्पर्धा चार टप्प्यांत पार पडणार असून प्रत्येक टप्पा सुमारे १०० किलोमीटर लांबीचा असेल. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतून ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय मान्यता २६ सप्टेंबर २०२५ रोजी मिळाली असून ५ ऑक्टोबर २०२५ रोजी युसीआय सायकलिंग कॅलेंडरमध्ये अधिकृतपणे समावेश करण्यात आला आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २१० आंतरराष्ट्रीय सायकल फेडरेशनना निमंत्रणे पाठविण्यात आली आहेत. आतापर्यंत २५ देशांतील पथकांनी सहभागाची तयारी दर्शविली आहे. युसीआय २.२ या निकषानुसार अधिकाधिक २४ पथके (टीम) या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. प्रत्येक पथकात चार खेळाडू असल्यामुळे एकूण १७६ खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी २८ डिसेंबर रोजी राष्ट्रीय सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्हा ग्रामीण पोलीस, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, क्रीडा विभाग यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणा समन्वयाने काम करत आहेत. विविध विभागांच्या समित्या गठीत करण्यात आल्या असून, बजाज ऑटो, सिरम इन्स्टिट्यूट, चितळे ग्रुप आणि पंचशील ग्रुप यांनी स्पर्धेची प्रायोजकत्व स्वीकारले आहे.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नागरिकांना सायकलचा वापर प्रोत्साहित करणे, निरोगी जीवनशैलीकडे समाजाला प्रवृत्त करणे, पायाभूत सुविधांचे अद्यावतीकरण करणे, तसेच विदेशी पर्यटकांना पुण्याची ओळख करून देऊन पर्यटन क्षेत्राचा विकास साधणे या उद्देशांनी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून पुणे जिल्हा जागतिक नकाशावर ठळकपणे झळकणार असल्याचे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.
यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही स्पर्धेबाबत माहिती दिली.

More Stories
Pune: तबलावादन आणि गायनाने युवा तालचक्र महोत्सवाला सुरुवात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘इंडियाज रोडमॅप टू ग्लोबल लीडरशीप इन ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग’ चे प्रकाशन
‘पुणे ग्रॅण्ड टूर २०२६’च्या बोधचिन्हाचे आणि जर्सीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण