पुणे, 03/11/2025: शिरूर तालुक्यात रविवारी ( दि.२) बिबट्याच्या हल्ल्यात १३ वर्षीय मुलाच्या मृत्यू आणि त्यानंतर ग्रामस्थांकडून झालेल्या तीव्र आंदोलनानंतर वनविभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक (पीसीसीएफ) यांनी आपत्कालीन उपाययोजनांअंतर्गत संबंधित बिबट्याच्या शिकारीसाठी परवानगी दिली आहे. जुन्नर वनविभागाच्या इतिहासात अशा प्रकारचा आपत्कालीन आदेश प्रथमच देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
रविवारी दुपारी सुमारे ३.४५ वाजता शिरूर तालुक्यातील पिंपरखेड (आंबेवाडी) येथे रोहन विलास बोंबे (वय १३) या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या २० दिवसांत अशाप्रकारची गावातील ही दुसरी घटना असून, एप्रिलपासून आतापर्यंत जुन्नर वनविभागंतर्गत
बिबट्याच्या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र रोष उसळला. संतप्त नागरिकांनी वनविभागाचे गाडी पेटवून दिली तसेच पिंपरखेडजवळील क्विक रिस्पॉन्स टीम (QRT)च्या कॅम्पवर देखील तोडफोड केली असल्याची माहिती वनविभागतर्फे देण्यात आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र परिस्थिती इतकी तणावपूर्ण होती की वनअधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचणेही अवघड झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी संबंधित बिबट्याला मरण्याचा आदेश जारी केला आहे.
या संदर्भात जुन्नर वनविभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांनी सांगितले की, “बिबट्या शोध मोहिमेसाठी तीक्ष्ण नेमबाजांची (शार्प शूटर्स) टीम बोलावण्यात आली असून ती लवकरच घटनास्थळी दाखल होणार आहे. सध्या पिंपरखेड आणि आसपासच्या परिसरात २५ पिंजरे, १० ट्रॅप कॅमेरे आणि ड्रोनच्या सहाय्याने बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे.”

More Stories
Pune: पदवीधर-शिक्षक मतदार नोंदणीसाठी ६ नोव्हेंबरपर्यंत मुदत : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
लोहगावातील झोपडीतून बहरैनपर्यंतचा सुवर्ण प्रवास… नंदीबैलवाल्याचा मुलगा ठरला आशियाई कुस्तीचा ‘गोल्डन बॉय’
Pune: कामात हलगर्जीपणा केल्याने शाखा अभियंता आकाश ढेंगे निलंबित