November 5, 2025

Pune: कोथरूड बस डेपो चौकात उभारणार दुमजली उड्डाणपूल; वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचे पाऊल

पुणे, ०३/११/२०२५: वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिकेच्या फेज २ अंतर्गत करण्यात येणाऱ्या विस्तारांतर्गत पुणे महामेट्रो तर्फे चांदणी चौकापर्यंत या मार्गिकेचा विस्तार केला जाणार आहे. त्याचबरोबर या मार्गावरील वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय म्हणून, कोथरूडच्या बस डेपो चौकात दुमजली उड्डाणपूल बांधण्यात येणार असल्याची माहिती महामेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

त्यामुळे नळ स्टॉप आणि विद्यापीठ चौका पाठोपाठ आता कोथरूडमध्येही मेट्रो आणि रस्ते वाहतुकीसाठी दुमजली उड्डाण पुल उभारण्यात येणार आहे. या पुलाचा वरच्या भागावरून मेट्रोची मार्गिका बांधली जाईल, तर खाली रस्ते वाहतुकीसाठी उड्डाण पूल असेल.

सध्या नळ स्टॉप चौकात असलेल्या पुलामुळे कर्वे रस्त्यावरून पौड फाटा किंवा डेक्कन कॉर्नरला जाणाऱ्या वाहतुकीला लॉ कॉलेज रस्त्याने येणारी वर्दळ अडचण ठरत नाही आणि कर्वे रस्त्यावरील मोठी कोंडी टळते. त्यानंतर विद्यापीठ चौकातील उड्डाण पुलाची एक बाजू नुकतीच खुली झाल्याने या रस्त्याचा वापर करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यानंतर पौड रस्त्यावर बांधण्यात येणारा हा उड्डाण पूल या चौकात होणारी कोंडी कमी करेल, तसेच मेट्रो मार्गिकेमुळेही पौड रस्त्यावरील वाहने कमी होण्यास मदत होईल.