November 5, 2025

Pune: वीस दिवसांत तीन बळी, शेवटी नरभक्षक बिबट्याचा अंत!

पुणे, 05/11/2025: शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात तेरा वर्षीय बालकाचा जीव घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याचा अखेर बंदुकीच्या गोळीने अंत झाला. सोमवारी रात्री उशिरा वनविभागाने केलेल्या कारवाईत सहा वर्षीय नर बिबट्या ठार करण्यात आला.

मौजे पिंपरखेड आणि लगतच्या परिसरात गेल्या वीस दिवसांमध्ये झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये शिवन्या शैलेश बोंबे (वय ५ वर्षे ६ महिने), भागुबाई रंगनाथ जाधव (वय ८२ वर्षे) आणि रोहन विलास बोंबे (वय १३ वर्षे) या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या सलग घटनांमुळे जुन्नर, शिरूर, आंबेगाव व खेड तालुक्यांमध्ये प्रचंड जनक्षोभ निर्माण झाला होता. याच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी १२ आणि २२ ऑक्टोबर रोजी पंचतळे येथे बेल्हे-जेजुरी मार्ग रोखला, तर ३ नोव्हेंबर रोजी मंचर येथे पुणे-नाशिक महामार्ग रोखून आंदोलन केले. या आंदोलकांनी संतापाच्या भरात वनविभागाचे गस्ती वाहन आणि स्थानिक बेस कॅम्पला आग लावून मोठी जाळपोळ केली.

३ नोव्हेंबर रोजी सुमारे १८ तास महामार्ग ठप्प राहिल्यानंतर, पिंपरखेड परिसरात सक्रिय असलेल्या नरभक्षक बिबट्याला जेरबंद किंवा ठार करण्यासाठी वनसंरक्षक (पुणे) आशिष ठाकरे यांनी तातडीने प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर यांची परवानगी घेतली. यानंतर वनविभागाने पुण्यातील रेस्क्यू संस्था आणि त्यांचे तज्ञ डॉक्टर सात्विक पाठक (पशुवैद्यक), तसेच शार्पशूटर जुबिन पोस्टवाला आणि डॉक्टर प्रसाद दाभोळकर यांच्या सहाय्याने कारवाई सुरू केली. संपूर्ण परिसरात कॅमेरे आणि थर्मल ड्रोन बसवून बिबट्याचा शोध घेतला गेला.

रात्री सुमारे १०.३० वाजता, घटनास्थळापासून जवळपास ४०० ते ५०० मीटर अंतरावर बिबट दिसून आला. त्याला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारण्यात आला; मात्र तो अपयशी ठरला. त्यानंतर चवताळलेल्या बिबट्याने टीमवर हल्ला चढवल्याने, शार्पशूटरने आत्मसंरक्षणार्थ गोळी झाडली. दोन गोळ्या लागल्याने बिबट्याचा जागीच मृत्यू झाला.

सदर बिबट्या पाच ते सहा वर्षांचा नर असल्याचे वनविभागाने सांगितले. मृत बिबट्याचे शव पिंपरखेड येथील ग्रामस्थांना दाखवून त्यानंतर माणिकडोह बिबट निवारा केंद्रात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले.

या संदर्भात स्मिता राजहंस, सहायक वनसंरक्षक, जुन्नर वन विभाग म्हणाल्या,
“जिल्हाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. संध्याकाळी थर्मल ड्रोनने पाहणी करताना बिबट्या सुमारे ४०० मीटर अंतरावर दिसला. डार्टिंगचा प्रयत्न अयशस्वी झाल्यावर तो चवताळून टीमकडे धावत आला. त्यावेळी शार्पशूटरने गोळी झाडल्याने त्याचा मृत्यू झाला. बिबट्याच्या पंजांचे ठसे, विष्ठेचे नमुने आणि इतर पुराव्यांच्या आधारे तोच हल्लेखोर बिबट्या असल्याची पुष्टी झाली असून, नमुने डीएनए तपासणीसाठी पाठविण्यात येतील.”

दरम्यान, काल सकाळी जेरबंद करण्यात आलेला दुसरा बिबट्या अजूनही पिंजऱ्यात बंदिस्त असून, गावकऱ्यांच्या तीव्र रोषामुळे त्याला दुसरीकडे हलविणे शक्य झालेले नाही, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.