पुणे, दि. १७ नोव्हेंबर २०२६: लोहगाव परिसराला पर्यटनाच्या दृष्टीने ‘क’ दर्जा प्राप्त असून, येथील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशात हरणतळे तलावाचे विशेष स्थान आहे. या तलावाचे गतवैभव जपून त्याचे संवर्धन व सुशोभीकरण करावे, तसेच प्रभाग क्रमांक ३ मधील विमाननगर, कलवड आणि लोहगाव परिसरातील नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणे हटवून प्रदूषण रोखण्यासाठी नियमित स्वच्छता व कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नगरसेविका ऐश्वर्या पठारे यांनी पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली.
एकेकाळी ‘फुलांचा तलाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरणतळे तलावाचे ऐतिहासिक महत्त्व आणि नैसर्गिक सौंदर्य जतन करण्याची आवश्यकता पठारे यांनी अधोरेखित केली. तलावातील पाण्याची गुणवत्ता, ड्रेनेजचे सांडपाणी मिसळण्याची शक्यता, अनधिकृत पाणी उपसा, स्वच्छता आणि जैवविविधता यांची सखोल तपासणी करावी. तसेच तलावाच्या संवर्धन व पुनरुज्जीवनासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करून नियमित स्वच्छता, सुशोभीकरण आणि पाण्याची गुणवत्ता टिकविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
यासोबतच विमाननगर, कलवड आणि लोहगाव परिसरातील नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणे आणि वाढत्या प्रदूषणाचा प्रश्नही त्यांनी सभागृहात मांडला. विमाननगर परिसरातील काही हॉटेल्समधून अन्नकचरा आणि सांडपाणी थेट नाल्यांमध्ये सोडले जात असल्याने दुर्गंधी व अस्वच्छतेची समस्या निर्माण होत आहे. काही ठिकाणी ड्रेनेजचे सांडपाणीही नैसर्गिक नाल्यांमध्ये मिसळत आहे. विमाननगर परिसरात गेल्या दोन महिन्यांत १०० हून अधिक डेंग्यूचे रुग्ण आढळल्याची बाबही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. या पार्श्वभूमीवर नाल्यांवरील अनधिकृत अतिक्रमणे हटवणे, नाल्यांची नियमित साफसफाई व गाळ काढणे, हॉटेल्समधील कचऱ्याची योग्य विल्हेवाट सुनिश्चित करणे आणि प्रक्रिया न केलेले सांडपाणी नाल्यांमध्ये सोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“लोहगावचा ऐतिहासिक वारसा असलेला हरणतळे तलाव आणि परिसरातील नैसर्गिक नाले ही आपल्या पर्यावरणाची महत्त्वाची संपत्ती आहे. लोहगावला पर्यटनाच्या दृष्टीने ‘क’ दर्जा प्राप्त असल्याने या वारशाचे संवर्धन करणे अधिक महत्त्वाचे आहे. हरणतळे तलावाचे गतवैभव जपण्यासोबतच नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणे आणि प्रदूषण रोखणे गरजेचे आहे. या समस्यांचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी कायमस्वरूपी कार्यवाही करून संबंधित विभागांनी आवश्यक कामे तातडीने पूर्ण करावीत, यासाठी माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा राहील.”— नगरसेविका ऐश्वर्या सुरेंद्र पठारे

More Stories
पुणे: भिडे पूल १९ नोव्हेंबरपासून वाहतुकीसाठी बंद; ३१ डिसेंबरपर्यंत पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
पुणे : जयस्तंभ शौर्यदिन सोहळ्याच्या तयारीला प्रशासनाकडून सुरुवात; १ जानेवारी २०२७ च्या कार्यक्रमाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
पुणे : कोंढव्यातील शीतल पेट्रोल पंपासमोरील एकेरी पार्किंगच्या नियमांना हरताळ; चार ते पाच लेनमध्ये वाहनांचे पार्किंग