November 17, 2026

पुणे: भिडे पूल १९ नोव्हेंबरपासून वाहतुकीसाठी बंद; ३१ डिसेंबरपर्यंत पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

पुणे, १७ नोव्हेंबर २०२६ : डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानक आण पेठ परिसराला जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या कामासाठी भिडे पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे मेट्रो प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत हा पूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

मुठा नदीवरील भिडे पुलाच्या वरून डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानक आणि पेठ परिसराला जोडणारा पादचारी पूल उभारण्यात येत आहे. या पुलामुळे नारायण पेठ, शनिवार पेठ आणि लक्ष्मी रस्ता परिसरातील नागरिकांसह या भागात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना डेक्कन मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचणे अधिक सोयीचे होणार आहे.

पादचारी पुलाचे बांधकाम सुरू असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भिडे पूल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला राहणार आहे.

भिडे पूल बंद असताना वाहनचालकांनी पर्यायी मार्ग म्हणून लकडी पूल, बालगंधर्व पूल आणि झेड ब्रिजचा वापर करावा, असे आवाहन पुणे मेट्रो प्रशासनाने केले आहे.

डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच या वाहतूक बदलामुळे पुणेकरांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल पुणे मेट्रोने दिलगिरी व्यक्त केली आहे.