November 26, 2026

पुणे महापालिका प्रशासनाचा महापौरांनाही घरचा आहेर!

पुणे, २५ नोव्हेंबर २०२६ : शहर विद्रूपीकरण रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने ‘भाऊ, फ्लेक्स काढा’ मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत नियम मोडणाऱ्या नगरसेवकांची नावे जाहीर करून प्रशासनाने आधीच राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. आता तर या मोहिमेची धडक थेट महापौर मंजुषा नागपुरे यांच्यापर्यंत पोहोचली आहे. महापौरांच्या प्रभागात सांडपाणी वाहिनी टाकण्याच्या कामाची माहिती देणारा फलक लावण्यात आला असून, त्यावर नागपुरे यांचा मोठा फोटो झळकत आहे. कामाची माहिती महापालिकेच्या अधिकृत ‘एक्स’ खात्यावरूनही मिळू शकते, मग फ्लेक्सची तसदी कशाला? असा उपरोधिक सवाल करत प्रशासनाने महापौरांनाच घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे फ्लेक्सविरोधी मोहिमेत महापौरांच्याच फोटोने प्रशासनाला नियमांची आठवण करून देण्याची वेळ आणली आहे!

महापालिकेच्या कामाच्या ठिकाणी कामाचे स्वरूप, कालावधी, खर्चाची रक्कम, ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक अशी माहिती असलेला फलक लावणे बंधनकारक आहे. मात्र, या माहितीच्या फलकाचे रूपांतर अनेकदा नगरसेवकांच्या प्रसिद्धी फलकात होते. कामापेक्षा लोकप्रतिनिधींचे छायाचित्रच मोठे दिसते. आता प्रशासनाने याच प्रसिद्धीच्या हौसेला चाप लावण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे उद्या कामाच्या फलकावर नगरसेवकांचा फोटो लावायचा की कामाची माहिती द्यायची, असा प्रश्न लोकप्रतिनिधींना पडण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या या भूमिकेचे समाजमाध्यमांवर नागरिकांकडून कौतुक होत आहे.