पुणे, दि. 25/11/2026: भीमाशंकर पर्यटनस्थळ व पश्चिम घाट परिसरातील आदिवासीबहुल गाव कोंढवळ, ता. आंबेगाव व शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला पर्यटन व परिसरातील विस्तीर्ण जंगल, फुलझाडे तसेच पारंपरिक मधमाशीपालन करणाऱ्या घटकांचा विचार करून जुन्नर तालुक्यातील कुसूर गावाला ‘मधाचे गाव’ म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मान्यता दिली.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मधकेंद्र योजना व ‘मधाचे गाव’ योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील गावांची निवड करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत सन २०२६-२७ या वर्षासाठी दोन गावांची निवड करण्यात आली.
या बैठकीस सदस्य सचिव तथा जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रमेश सुरुंग उपस्थित होते.
यावेळी मधकेंद्र योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ६८ मधपाळांना मधमाशीपालन प्रशिक्षणासाठी मंजुरी देण्यात आली. मधुवन ब्रँडअंतर्गत जास्तीत जास्त मधाची विक्री करणे, प्रशिक्षित व कुशल मधपाळ निर्माण करणे आणि मधमाशीपालनाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.
मध उद्योग हा युवकांसाठी पूरक व्यवसाय व स्वयंरोजगाराचे प्रभावी माध्यम ठरू शकतो. त्यामुळे युवकांनी या क्षेत्रात पुढाकार घेऊन मधमाशीपालन व्यवसायाकडे वळावे, तसेच निवड झालेल्या गावांमध्ये मधमाशीपालन प्रशिक्षणाबरोबरच इतर पूरक उद्योग उभारणी करावी, मधापासून तयार होणाऱ्या उपपदार्थांचे उत्पादन व विक्री तसेच व्यवसायवृद्धीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले.
याशिवाय अधिकाधिक युवकांना या उद्योगामध्ये सहभागी करून घेण्यासाठी मध व मधमाशीपालन उत्पादनांच्या विक्रीसाठी योग्य व्यवस्था निर्माण करणे, मधाचा प्रचार व प्रसार करणे आणि प्रशिक्षणाची व्याप्ती गावपातळीवर वाढवून हे काम अधिक परिणामकारक करावे, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.
या योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती, युवकांना स्वयंरोजगार, पारंपरिक मधमाशीपालन व्यवसायाला चालना आणि स्थानिक पातळीवर आर्थिक विकास साधण्यास निश्चितच मदत होणार आहे.
बैठकीच्या शेवटी सदस्य सचिव श्री.सुरुंग यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे आभार मानले.

More Stories
प्रशासकीय राजवटीत अधिकाऱ्यांना ही अतिक्रमणे दिसली नाहीत का ? महापौर मंजूषा नागपूरे यांचा सवाल
बाल सभांमधून विद्यार्थी दाखवणार अधिकाऱ्यांना आरसा पुणे महापालिकेचा उपक्रम
पुणे महापालिका प्रशासनाचा महापौरांनाही घरचा आहेर!