पुणे, दि. ८ मार्च, २०२४ : महिला दिनाचे औचित्य साधत पुण्यातील प्रेरणा संगीत संस्थेच्या वतीने आपापल्या क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना सन्मान करण्यात आला. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मयूर कॉलनी येथील एमईएस बालशिक्षण सभागृह या ठिकाणी सदर कार्यक्रम संपन्न झाला. प्रेरणा म्युझिक संस्थेच्या संस्थापिका आणि जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका विदुषी सानिया पाटणकर यांच्या हस्ते यावेळी श्री बालाजी विद्यापीठ, पुणे या संस्थेच्या आर्ट्स, हयुमॅनिटीज आणि सोशल सायन्सेन विभागाच्या प्राचार्या डॉ प्रीती जोशी, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सीमा लिमये, शिक्षिका संयोगिता शितोळे आणि संत साहित्याच्या अभ्यासिका मिताली लिमये यांचा सन्मान करण्यात आला. हरी शंकर नगरकर ज्वेलर्सचे संचालक दिलीप नगरकर, संचालिका सुनीता नगरकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यासोबतच अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील स्त्रियांवर फलटण येथील प्रा अशोक शिंदे यांचे व्याख्यान देखील संपन्न झाले.
यावेळी बोलताना प्रा शिंदे म्हणाले, “स्वातंत्रपूर्व काळापासून हिराबाई पेडणेकर, कमला कामत- गोखले, ताराबाई माने, विदुषी हिराबाई बडोदेकर या स्त्रियांनी मराठी नाट्य भूमी आणि शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले. या महिलांनी नाट्यभूमीला एक नवा आयाम दिला. महिला म्हणून या क्षेत्रात त्यांनी केलेला संघर्ष आणि त्यांना आलेले अनुभव पुढच्या पिढीसाठी वाटा सुखकर करणारे ठरले.”
१८६०-६५ दरम्यान स्त्रियांचा वावर मराठी रंगभूमीवर सुरु झाला असे सांगत प्रा शिंदे पुढे म्हणाले, “महिला कलाकारांनी या क्षेत्रात अनेक परंपरांची पायाभरणी केली. दुर्गा कामत यांचे नाव यामध्ये अग्रक्रमाने घ्यावे लागेल. सामाजिक नाटक मंडळीत त्या गायन करायचे. पार्श्वगायन करणाऱ्या स्त्री कलाकारांमध्ये त्यांचे नाव घेता येईल. त्यांनी ही कला पुढच्या पिढीपर्यंत रुजवली आणि म्हणूनच आपल्याला कमला गोखले, हिराबाई बडोदेकर ही नावे दिसतात.” हिराबाई बडोदेकरांनी १९२१ साली मुंबईत पहिल्यांदा तिकीट लावून जलासा गायला होता. या सर्व स्त्रियांनी कौटुंबिक संघर्ष सहन करून शास्त्रीय संगीताला आधार दिला, असेही प्रा शिंदे म्हणाले.
फोटो ओळ – महिला दिनाचे औचित्य साधत पुण्यातील प्रेरणा म्युझिक संस्थेच्या वतीने आपापल्या क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना सन्मान करण्यात आला. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मयूर कॉलनी येथील एमईएस बालशिक्षण सभागृह या ठिकाणी सदर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी फोटोत (डावीकडून) सीमा लिमये, डॉ प्रीती जोशी, सानिया पाटणकर, संयोगिता शितोळे आणि मिताली लिमले आदी.
More Stories
तळेगाव–चाकण–शिक्रापुर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी Rs ५९.७५ कोटी निधीस मान्यता
Pune: मुळा-मुठेला प्रदूषणातून सुटका? मंजूर झाला तब्बल ८४२ कोटींचा मेगा प्लॅन
Pune: वसतिगृह स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय