पुणे, दि. १७ डिसेंबर, २०२४ : ४५ वर्षांहून अधिक काळ आर्किटेक्चर क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जुबेर शेख, अनिल हटकर आणि इक्बाल चनी या ज्येष्ठ वास्तुविशारदांचा त्यांनी या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल इंडिअन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस, पुणे विभागाच्या वतीने आयआयए एस. के. बेलवलकर अवार्ड फॉर एक्सलन्स इन प्रोफेशन पुरस्कार प्रदान करीत नुकताच सन्मान करण्यात आला.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स (आयआयए)च्या पुणे विभागाला ६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने डी पी रस्त्यावरील पंडित फार्म्स येथे आयोजित विशेष कार्यक्रमात या सर्वांना गौरविण्यात आले. याबरोबरच पुणे परिसरातील आर्किटेक्चर महाविद्यालयातील डॉ. अभिजित नातू, डॉ. सुजाता कर्वे, प्रो. फातिमा कबीर, प्रो. आरती पाटील आणि डॉ. स्वाती सहस्त्रबुद्धे यांना उत्कृष्ट शिक्षकांना देण्यात येणाऱ्या आयआयए एस. जे. कॉन्ट्रॅक्टस् अवार्ड फॉर एक्सलंस इन टीचिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मानपत्र व मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप होते.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टसच्या राष्ट्रीय कार्यकारणीचे मानद सहसचिव वास्तुविशारद संदीप बावडेकर, बेलवलकर समूहाचे समीर बेलवलकर, एस जे कॉन्ट्रक्ट्सचे संचालक सौरभ जंगले, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स (आयआयए)च्या पुणे विभागाचे अध्यक्ष वास्तुविशारद विकास अचलकर, उपाध्यक्ष वास्तुविशारद सीतेश अग्रवाल हे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. आयआयए महाराष्ट्राच्या स्मरणिकेचे प्रकाशन देखील यावेळी संपन्न झाले. स्मरणिकेच्या संपादिका वास्तुविशारद मृणालिनी साने यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान विवेक भोळे आर्किटेक्टसचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक वास्तुविशारद विवेक भोळे आणि चेन्नईस्थित अर्बन डिझाईन फर्म असलेल्या आर्किटेक्चरआरईडी संस्थेचे सहसंस्थापक वास्तुविशारद बिजू कुरियाकोसे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मुंबईत साकारलेल्या प्रकल्पांचा अनुभव यावेळी भोळे यांनी उपस्थितांसमोर विशद केला. पुण्यापेक्षा मुंबईमध्ये एफएसआयचा मोठा फायदा मिळत असल्याचे सांगत भोळे म्हणाले, “आपला भारत देश हा विषुववृत्तावर वसलेला देश असल्याने इमारत उभारताना आपण दुबई किंवा इतर देशांशी तुलना करण्यापेक्षा सिंगापूरशी तुलना करणे अधिक संयुक्तिक आहे असे मला वाटते. नजीकच्या भविष्यात भारतात उंच इमारतींची संख्या वाढणार असून हे होत असताना वास्तुविशारदांना चौकटीपलीकडे विचार करावा लागणार आहे. इमारती उभारणी करीत असताना खाजगी जागांसोबतच सार्वजनिक जागांचाही विचार व्हायला हवा.”
पर्यावरणाशी संबंधित बाबी, सामाजिक-आर्थिक व्यत्यय आणि सांस्कृतिक बहुविधता या चौकटीत काम करीत असताना आज वास्तुविशारदांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र समाजासोबत संलग्नपणे काम करीत असताना वास्तुविशारदांनी केवळ इमारती उभारण्यावर लक्ष केंद्रित न करता समाजभान जागृत ठेवत कार्यरत राहणे ही काळाची गरज असल्याचे बिजू कुरियाकोसे म्हणाले. सध्याच्या काळात वास्तुविशारद हा केवळ एक मास्टर आर्किटेक्ट्स नसून एक ‘फॅसिलिटेटर’, ‘कोलॅबरेटर’ व ‘इनोव्हेटर’ आहे हे लक्षात घेत आपल्याला पुढे जायचे आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. चेन्नई, त्रिवेंद्रम येथे सुरु असलेल्या प्रकल्पांमधील आव्हाने आणि त्यावर केलेल्या उपाययोजना याचीही माहिती कुरियाकोसे यांनी दिली.
प्रास्ताविक करीत असताना ६० वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत आयआयएच्या पुणे विभागाचे काम आणि नजीकच्या भविष्यातील योजना विकास अचलकर यांनी उपस्थितांसमोर मांडल्या. शहरातील प्रसिद्ध वास्तुविशारद, वास्तुविशारद संस्था, विद्यार्थी, प्राध्यापक, प्रोफेसर व या क्षेत्राशी संबंधित ५०० हून अधिक मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित होते. नीलम दासवानी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमानंतर तारिक फैज यांच्या सुफी नाईट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

More Stories
Pune: मला कुठलीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी मोजायला मी तयार – माजी आमदार रवींद्र धंगेकर
HND जैन बोर्डिंगचे विश्वस्त श्री जयंत नांदुरकर यांना आचार्य श्री गुप्ती नंदीजी यांनी खडेबोल सुनवत खरेदी व्यवहार रद्द करण्यास सांगितले
Pune: जैन बोर्डिंग प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, मुख्यमंत्र्यांनी जैन बोर्डिंगसाठी १०० कोटी जाहीर करावे – धंगेकर