October 27, 2025

पुणे: दंडात्मक कारवाईसाठी भरारी पथकात आणखी १० गाड्या

पुणे, २४ डिसेंबर २०२४: रस्त्यावर कसरा जळणे कचरा जाळणे ठोकणे राडाराडा टाकणे अशा अनेक पद्धतीने अस्वच्छ केली जात आहे. त्यावर कारवाई करण्यासाठी भरारी पथक तयार केले आहे या पथकाला गाड्यांच्या सहाय्याने स्वच्छता करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवता येणार आहे. मंगळवारी आणखी दहा गाड्या महापालिका प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे भरारी पथकाकडील गाड्यांची संख्या १८ झाली आहे.

मध्य प्रदेशातील इंदौर शहराच्या पार्श्‍वभुमीवर, पुणे महापालिकेने शहरात अस्वच्छता करणाऱ्यांवर वचक बसावा, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करता यावी, यासाठी भरारी पथक तयार केले. या पथकाला शहरात कारवाई करणे सोईस्कर व्हावे, यासाठी महापालिका प्रशासनाने अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त वाहने उपलब्ध करून दिली होती. मंगळवारी दहा नवीन गाड्या भरारी पथकाच्या ताफ्यात दाखल झाल्या. या गाड्यांचे लोकार्पण महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम, परिमंडळ एकचे उपायुक्त राजू नंदकर, प्रसाद जगताप व मुकुंद बर्वे आदी उपस्थित होते.

घनकचरा विभागाकडुन अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईवर भर दिला जातो. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे, बंदी असलेल्या प्लॅस्टिकचा वापर करणे, राडारोडा टाकणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा जाळणे अशा प्रकारांसाठी संबंधित कारवाई केली जाते. ऑक्‍टोबर २०२३ ते २४ डिसेंबरपर्यंत ७२ हजार ७७८ प्रकरणांमध्ये चार कोटी तीन लाख ७१ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. ६ हजार २६८ किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे.