October 26, 2025

पुणे: मनपा शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी ‘शिक्षण परिषद’

पुणे, ता. २४/०२/२०२५: पुणे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण घेतले जाणार आहे. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय शिक्षण परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. त्यानंतर जर गुणवत्ता घसरली तर त्यास शिक्षकांना जबाबदार धरले जाणार आहे.

शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेसंदर्भात ‘असर’चा अहवाल जानेवारी महिन्‍यात जाहीर झाला आहे. त्यामध्ये पुणे शहर, जिल्ह्यातील गुणवत्तेबाबत गंभीर गोष्टी समोर आल्या आहेत. त्यामध्ये इयत्ता ६वी ते ८वीच्या ४० टक्के विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना भागाकार करता येत नाही, मुळ अक्षरे ओळखता येत नाहीत, मुलांना एक ते ९९ पर्यंतचे आकडे ओळखता येत नाहीत. ५ ते १६ वयोगटातील निम्म्या विद्यार्थ्यांना अंक गणित जमत नाही, सरकारी शाळांमधील प्रवेश संख्या घटली आहे, मुलांचा स्मार्टफोनचा वापर वाढला आहे असे निरीक्षणे नोंदविली गेली आहेत.

पुणे महापालिकेतर्फे शाळांवर दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत. पण त्यातुलनेत गुणवत्ता वाढत नाही. असरच्या अहवालावर अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी आज शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी व त्यांच्या कार्यपद्धतीत बदल करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तरावर शिक्षण परिषद आयोजित केली जाईल. मी स्वतः विभागीय स्तरावर शिक्षण परिषद घेणार आहे.

महापालिका शिक्षणावर मोठा खर्च करत आहे, पण गुणवत्ता वाढत नसेल तर योग्य नाही. शिक्षकांनी गुणवत्ता वाढीसाठी काय करावे हे त्यांनी प्रशिक्षणातून सांगितले जाईल. पण त्यानंतरही गुणवत्ता वाढणार नसेल तर त्यांची जबाबदारी निश्‍चित केली जाणार आहे. असे पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.