पुणे, १० मार्च २०२५: अखेर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली बातमी आली. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज पुण्यातील लोकं झोपेतून उठण्याआधीच काँग्रेसला रामराम ठोकला. कसबा पोट निवडणुकीतील विजयाचा धंगेकर पॅटर्न गाजवणाले धंगेकरांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा मार्ग स्वीकारला आहे. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅप स्टेट्समधील फोटोत त्यांनी गळ्यात भगवं उपरणं परिधान केल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर मोठी चर्चा रंगली होती. आज त्या चर्चेवर शिक्कामोर्तब झालं. धंगेकर काँग्रेस पक्ष सोडणार असून ते शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आज त्यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पक्षप्रवेशाबाबत सविस्तर भाष्य केल आहे. आज ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहेत. या भेटीवेळी पक्षप्रवेशाबाबतची तारीख ठरणार असल्याची माहिती समोर आली आहे, याआधी रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांची आणि उदय सामंत यांची भेट घेतली होती. तेव्हापासून ते काँग्रेस सोडून शिवसेनेत जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्यावेळी धंगेकरांनी त्यावरती मी जाणार नाही असं म्हटलं होतं. मात्र, आज त्यांनी पक्ष सोडणार असल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे. तसंच, माझा कोणाच्या बांधाला बांध नाही. त्यामुळे नाराजीचा प्रश्न नाही. माझी काँग्रेस पक्षावर कधीही नाराजी नव्हती. त्यांनी मला भरभरुन दिलं. पण राजकारणात कार्यकर्त्यांच्या भावना महत्त्वाच्या असतात. कार्यकर्त्यांचा कुठेतरी विचार करणं गरजेचे आहे. मी आज एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे. त्यानंतर मी निर्णय घेईन, असे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले.
काय म्हणाले धंगेकर?
ज्या पक्षासोबत मी गेली १०-१२ वर्षे काम करत आहे. त्यामुळे पक्षातील अनेकांसोबत कौटुंबिक नातं तयार झाले आहे. सर्वांनीच माझ्यावर प्रचंड प्रेम केले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सगळ्यांना माझ्यापाठी ताकद उभी केली. मी निवडणूक हरलो हा नंतरचा विषय,पण सगळ्यांना त्यांच्या ताकदीप्रमाणे कष्ट केले. एखादा पक्ष सोडताना दु:ख होतं. शेवटी आपण माणूस आहोत. कार्यकर्ते बऱ्याच दिवसांपासून ऐकत नव्हते. मी मतदारांशी संवाद साधला तेव्हा ते म्हणत होते आता आमची कामं कोण करणार, लोकशाहीत सत्ता असल्याशिवाय आपण सर्वसामान्यांना न्याय देऊ शकत नाही असं धंगेकर यावेळी म्हणाले.
मी मध्यंतरी एकनाथ शिंदेंना कामानिमित्त भेटलो होतो. मी उदय सामंत यांच्याशीही मी संपर्कात होतो. त्यांनी वारंवार म्हटलं की, आमच्यासोबत काम करा. याची बरीच चर्चा झाली. मी ज्या भागात वर्षानुवर्षे काम करत आहे, तेथील लोकांशी बोललो. मग लक्षात आलं की, तुम्हाला काम तर करावचं लागेल. पण सत्तेशिवाय काम होत नाही एकनाथ शिंदे यांनी मी काँग्रेसचा आमदार असतानाही मला मदत केली होती. असं लक्षात आलं की, ज्यांचा चेहरा सर्वसामान्यांमध्ये पोहोचला आहे, त्यांच्यासोबत काम करायला हरकत नाही, अशी मानसिकता झाली. मी आज माझा निर्णय घेतला, आपण शिंदे साहेबांसोबत काम करावं. आमची संध्याकाळी सात वाजता भेट होईल. त्यानंतर आमचा निर्णय होईल, असे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले.
काँग्रेस सोडण्याचं कारण काय?
मी पहिल्यांदाच काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्य़कर्ते आणि मतदारांचा आभारी आहे. मी त्यांचा कायम आभारी आहे. माझी विचारसरणी मानवतवादी आहे. काँग्रेसने माझ्यासारख्याला त्यांनी विधानपरिषद, लोकसभा अशी उमेदवारी दिली. शेवटी जनता ठरवते कोणाला निवडून द्यायचं, कोणाला नाही? काँग्रेसचे पुण्यातील कार्यकर्ते उत्साही आणि काम करणारे आणि प्रेमळ आहेत. पक्षाचे पदाधिकारी चांगल्याप्रकारे माझ्या पाठी उभे राहिले. निवडणुकीत दोनवेळा उभा राहून माझा पराभव झाला, पण मी कोणाला दोष दिला नाही. काँग्रेस पक्ष सोडणं सोपं नाही. पण माझ्या मतदारसंघातील लोकांशी चर्चा घेऊन कठीण निर्णय घेण्याची वेळ आली. शिंदे साहेब आणि उदय सामंत यांनी मला अनेकदा फोन केली. धंगेकर आमच्याकडे या, अशी ऑफर दिली. आमच्यात मित्रत्त्वाचं नातं आहे. त्यामुळे एकत्र काम करण्याचं ठरवले. मी त्यांना सात वाजता भेटून पुढील निर्णय घेईन, असे रवींद्र धंगेकर यावेळी म्हणाले.
मानकर, रसनेंशी जुळवून घेणार का?
रवींद्र धंगेकर हे कसबा मतदारसंघात कार्यरत असतात. ते कायम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतात. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते त्यांच्यावर टीका करायची संधी सोडत नाहीत. विद्यमान आमदार हेमंत रासने यांनी धंगेकरांचा पराभव केला आहे. तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत धंगेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे ऐन निवडणुकीतही मानकर यांनी धंगेकर यांच्या विरोधात जोरदार आघाडी उघडली होती. त्याच्यात आता ही वाद आहेत. त्यामुळे आता महायुतीमध्ये आलेले धंगेकर रासने, मानकरांशी जुळवून घेणार का? असा प्रश्न पडला आहे.

More Stories
Pune: मला कुठलीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी मोजायला मी तयार – माजी आमदार रवींद्र धंगेकर
HND जैन बोर्डिंगचे विश्वस्त श्री जयंत नांदुरकर यांना आचार्य श्री गुप्ती नंदीजी यांनी खडेबोल सुनवत खरेदी व्यवहार रद्द करण्यास सांगितले
Pune: जैन बोर्डिंग प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, मुख्यमंत्र्यांनी जैन बोर्डिंगसाठी १०० कोटी जाहीर करावे – धंगेकर